एसटीच्या 48 हजार कर्मचाऱ्यांकडून घेतले पैसे; न्यायालयात सदावर्तेंची कबुली

106

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गिरगाव न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंना यांना बुधवारी पुन्हा मुंबईत आणण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा सदावर्ते यांचा ताबा घेतला. तसेच सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी त्यांना बुधवारी गिरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सदावर्तेंनी सुनावणीवेळी न्यायालयात स्वतःची बाजू मांडली. न्यायालयातील सुनावणीदरम्यान सदावर्तेंनी स्वतःसाठी युक्तीवाद केला. जवळपास 48 हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतल्याची माहिती स्वतः सदावर्तेंनी न्यायालयात दिली.

काय म्हणाले सदावर्ते

युक्तीवाद करत असताना सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. दुसऱ्या एका गुन्ह्यात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मी अर्ज केला आहे म्हणून पोलीस माझी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच मी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो, पण याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलीस कोठडीची काय गरज? पोलीस पहिल्या दिवशी माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सगळी तपासणी केली आहे. माझ्या घरी फक्त 13 वर्षांची मुलगी आहे आणि ती देखील पोलिसांना सहकार्य करत आहे, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले.

(हेही वाचा – टीका करणं भोवलं! अमरावतीत अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल)

सदावर्ते म्हणाले, मान्य करतो की…

दरम्यान, सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात आणले असून सुनावणी सुरु आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानंतर स्वतः सदावर्ते युक्तिवाद करत आहेत. पुढे सदावर्ते म्हणाले की, मान्य करतो की मी एसटी कर्मचाऱ्यांकडून 200 ते 300 रुपये घेतले, ते माझ्या मर्जीने घेतले. पण एकाही कर्मचाऱ्याने याबद्दल तक्रार केली नाही आहे. माझ्याकडे एसटीचे 48 हजार क्लायन्ट होते. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी न्यायालयाला सांगावे.

सरकारी वकील प्रदीप घरत यांचा धक्कादायक दावा

सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा केला आहे. मी एकाही कर्मचाऱ्याकडून पैसे घेतले नाहीत, एकही रुपया घेतला नाही, असं सदावर्ते याआधी वारंवार सांगायचे, मात्र आता त्यांनी पैसे घेतल्याचे कबुल केले आहे. सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. सदावर्ते यांनी परळ आणि भायखळ्याची मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे. संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची आहे, असा युक्तीवाद प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.