राज्यातील जंगलांना दोन वर्षांत किती वेळा लागली आग? आकडा वाचून थक्क व्हाल…

97

मागच्या दोन वर्षांत राज्यात 14 हजार वणव्यांच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यातून राज्याचे वनखाते वणवा प्रतिबंधक उपायात कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वणव्यांमुळे सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान झाले आहे. तसेच राज्यातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.

राज्याच्या वनक्षेत्राची मोठी हानी

राज्यात गेल्या काही वर्षात वणव्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वणवा लागू नये, म्हणून वनखात्याकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जाळरेषा तयार करण्याचे काम केले जाते. त्यासाठी वेगळा निधीदेखील दिला जातो. मात्र, कित्येकदा या जाळरेषा तयार करण्यास उशीर होतो. ब-याचदा तर त्या पूर्णच केल्या जात नाहीत. पैशांच्या नुकसानीपेक्षाही राज्यातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. अलीकडच्याच वनसर्वेक्षण अहवालानुसार, राज्यातील वनक्षेत्रात वाढ झाली, तरीही त्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात मोठी घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात वणव्याच्या सर्वाधिक 4 हजार 689 घटना घडल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात 609 घटना आहेत. या जिल्ह्यात वणवा असो अथवा प्रकल्पात गेलेले जंगल, राज्याच्या वनक्षेत्रासाठी ती सर्वात मोठी हानी आहे.

( हेही वाचा: कोरोना मृतांच्या भरपाईत विलंब का? सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना फटकारलं! )

आगीच्या घटनांची नोंदच नाही

माहिती अधिकारात वनखात्याकडे माहिती मागितली असता, केवळ संख्या आणि पैशांचे नुकसान एवढीच माहिती देण्यात आली, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी सांगितले. जंगल किती जळाले, किती माणसे मृत्युमुखी पडली. आग विझवण्यासाठी काय यंत्रणा आहे, वणवा विझवताना जखमी अथवा मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे वनखात्याने टाळले आहे. एवढेच नाही, तर 2021 हे वर्ष संपले असतानाही, या वर्षातील आगीच्या घटनांची नोंदच खात्याकडे नाही, असे उत्तर दिेले जाते. हा सरळसरळ जबाबदारी ढकलण्याचा प्रकार असल्याचं, अभय कोलारकर यांनी सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.