बाबाराव सावरकरः सशस्त्र आणि सशक्त क्रांतीचे स्फूर्तीस्थान

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतिकार्यातही भाग घेतला. 13 जून ही बाबारावांची जयंती.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटवली क्रांतीची मशाल

बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतिकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्‍ती यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीत देखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि प्रखर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी `मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजर्‍या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्‍ती जागृत होण्यास खूपच मदत झाली.

वन्दे मातरम् अभियोग 

बाबारावांचा ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास बंदी असतानाही त्यांनी ती मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड ठोठावण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी `वन्दे मातरम्’चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने `बोंब मारणे बंद करा’, असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले. या प्रसंगाने संतप्‍त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग’ या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळ्या ठिकाणी सहा महिने चालला. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा जामीन मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असताना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या. स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे प्रकाशन

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०६ साली लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाला वीर सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्यावेळी अनेकांनी मुखोद्‌गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला. त्यानंतर सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या `१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या. या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्रात `गदर’ पक्षाची स्थापना होऊ शकली. लंडनहून स्वा. सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकांपर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला.

जन्मठेपेची शिक्षा

क्रांतीकारकांच्या अनेक गुप्‍त उद्योगांत बाबाराव सावरकरांचा हात आहे आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे, हे ब्रिटीश गुप्‍तहेर खात्याने ओळखले होते. १९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते. अंदमानातील `सेल्युलर जेल’मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्‍याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या वीर सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले.

बाबारावांची ग्रंथसंपदा

बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. `वीर बैरागी’ या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी, सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. `राष्ट्रमीमांसा’ या पुस्तकात त्यांनी `भारत हे हिंदुराष्ट्र आहे’ हे सिद्ध केले आहे. `श्री शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप’ या पुस्तकात आग्र्‍याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. `वीरा-रत्‍नमंजुषा’ या पुस्तकात महाराणी पुष्पवती, राजा दाहिरच्या दोन वीरकन्या, राणी पद्मिनी, पन्नादायी आदी रजपूत स्त्रियांची चरित्रे वर्णिलेली आहेत. `हिंदुराष्ट्र – पूर्वी, आता नि पुढे’, `धर्म हवा कशाला ?’, ‘ख्रिस्तास् परिचय अर्थात्ख्रिस्ताचे हिंदुत्व’ ही त्यांची अन्य पुस्तके आहेत.

आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे कालवश झाला. बाबारावांचे चरित्र म्हणजे राष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या एका थोर देशभक्‍ताची स्फूर्तीदायी कथा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here