राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन… मुख्यमंत्री करणार घोषणा!

सध्याच्या निर्बंधांमुळे काहीच फरक पडत नसल्याने, आता 100 टक्के लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही, असे मंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे.

155

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती ही हाताबाहेर जात आहे. रोज कोरोना रुग्णसंख्या नवीन उच्चांक गाठत आहे. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पाऊले उचलण्यावर विचार सुरू आहे. राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार असल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

कॅबिनेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता

राज्यातील कोरोनाला हरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरू आहे. त्यात हा निर्णय होण्याची शक्यता दिसत आहे. राज्यात 100 टक्के लॉकडाऊन करावा, अशी मागणी कॅबिनेट मंत्र्यांनी बैठकीत केल्याचे समजते. सध्याच्या निर्बंधांमुळे काहीच फरक पडत नसल्याने, आता 100 टक्के लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही, असे मंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे. थोड्याच वेळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचाः राज्यात ‘ही’ दुकाने फक्त चार तास सुरू राहणार… काय आहे राज्य सरकारची नवी नियमावली?)

थोड्याच वेळात मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय

तर राज्यात काही तासात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही लॉकडाऊनबाबत स्पष्टता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन कडक असला पाहिजे. सुरुवातीला जसा लॉकडाऊन झाला तसाच लॉकडाऊन असेल. आम्ही सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. उद्यापासून हा लॉकडाऊनचा निर्णय लागू होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री स्वतः याबाबतीतला निर्णय जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.

वडेट्टीवारांनी दिले होते संकेत

राज्यात संचारबंदी करुन त्याचा फायदा सध्या हवा तसा होताना दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही, अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, तसेच इतर लहान दुकानदारही लॉकडाऊन १०० टक्के व्हावा, अशी मागणी करत आहेत. अनेक जिल्ह्यांत नागरिक देखील कडक लॉकडाऊन करा, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय देतील अशी अपेक्षा आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.