काळं धन परत आलं तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपाने 2014 साली जोरदार प्रचार केला. त्यानंतर मोदी आणि भाजपा दोघांनाही अच्छे दिन आले. पण आपल्या अच्छे दिनच्या प्रतिक्षेत सामान्य माणूस मात्र ‘दीन’वाणी चेहरा करुन बसला आहे. महिनाभर रहाटगाडग्याच्या जात्यात भरडून घेतल्यावर त्याच्या खात्यात पगार जमा होतो. पण मोदींचे 15 लाख काही येत नाहीत.
(हेही वाचाः मुंबईकरांनो माहीत आहे का? तुम्ही ‘इतके’ तास ट्रॅफिकमध्ये अडकताय…)
पण अचानक औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्वर आवटे यांना आपल्या खात्यात 15 लाख रुपये जमा झाल्याचे कळते, त्यांना अत्यानंद होतो, ते त्या पैशातून घरही बांधतात. थांबा आता लगेच तुमचं अकाऊंट तपासायला जाऊ नका… अभी कहानी मे ट्विस्ट आना बाकी हैं मेरे दोस्त…
(हेही वाचाः ‘आरटीई’ प्रवेश नोंदणीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा का फिरवतायेत पाठ?)
त्यांनी मोदींचे मानले आभार
ऑगस्ट 2020 मध्ये औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्दन आवटे यांच्या खात्यात 15 लाख 34 हजार 624 रुपये जमा झाले. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तिकीट न काढता आपल्याला लॉटरी कशी लागली हा प्रश्न त्यांना पडला. पण मोदींनी दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं असावं असं त्यांना वाटलं आणि ते अत्यानंदित झाले. तरीही त्यांनी काही महिने पैसे काढण्याची घाई केली नाही. पण नंतर त्यांनी आपल्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यातून 9 लाख रुपये काढले आणि स्वतःचं घर बांधायला सुरुवात केली. आपल्याला मिळालेल्या मदतीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रंही लिहिलं.
(हेही वाचाः आदित्य ठाकरेंना गोव्यात गेलेल्या सेना नेत्यांविषयी शंका! कोणती ते वाचा…)
पण बसला धक्का…
पण आपल्या घराचे बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच त्यांना मोठा धक्का बसला. ते जेव्हा पुन्हा पैसे काढण्यासाठी बँकेत गेले तेव्हा त्यांना बँकेने पैसे काढण्यास नकार दिला. कारण डिसेंबरच्या सुमारास स्थानिक ग्रामपंचायत आणि सरकारी प्रशासनाच्या लक्षात आले की, १५ व्या वित्त आयोगांतर्गत पिंपळवाडी ग्रामपंचायतीला दिलेला निधी आवटे यांच्या खात्यात “चुकून”जमा झाला आहे.
अशी झाली चूक…
या गलतीच्या मिस्टेकबद्दल आता बँक, ग्रामपंचायत आणि प्रशासकीय अधिकारी एकमेकांवर आरोप करत आहेत. असे असले तरी आवटे यांनी त्यांनी खर्च केलेले पैसे परत करावेत, यावर मात्र या सर्व सरकारी यंत्रणांचे एकमत आहे. पैसे ट्रान्सफरसाठी ग्रामपंचायतीऐवजी आवटे यांचा बँक खाते क्रमांक कोणीतरी चुकून दिला होता, त्यामुळे हा घोळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे म्हणजे आपल्या चुकीचे खापर दुस-याच्या माथी फोडण्याचा प्रकार आहे.
(हेही वाचाः पुण्यात भाजपाचे शक्तीप्रदर्शन! सोमय्यांचा दणक्यात सत्कार!)
कायदेशीर कारवाईचा इशारा
या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे शेतकरी ज्ञानेश्वर आवटे मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. पैसे परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांना बँकेकडून देण्यात आला आहे. ज्ञानेश्वर हे लहान शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्याकडे केवळ 2 एकर बागायती जमिनीचा तुकडा आहे. त्यामुळे त्यांना एकरकमी इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने त्यांचं कुटुंब चिंतेत आहे.
त्यामुळे उद्या जर का तुमच्या खात्यात अचानक अशी रक्कम जमा झाली तर ती चूक तर नाही ना हे तपासून घ्या. नाहीतर चालू असलेले ‘अच्छे दिन’ फिरण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.
(हेही वाचाः बच्चू कडूंमुळे ‘मविआ’ला काळिमा, काय आहे कारण)
Join Our WhatsApp Community