योगामुळे सुधारतेय स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या जगण्याची उमेद, TATA रुग्णालयातील महत्त्वपूर्ण संशोधन

161

योगा या पारंपरिक भारतीय व्यायामप्रकाराचा अवलंब केल्यास स्तन कर्करोगासारख्या घातक कर्करोगावर आता मात करणे शक्य झाल्याचे महत्त्वापूर्ण संशोधन परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केले आहे. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी या संशोधनाबाबत माहिती देताना १५ टक्के स्तन कर्करोगाच्या रुग्णांना मरणातून परतायला मदत झाल्याची माहिती दिली. भारतात स्तन कर्करोगाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढत असताना या संशोधनामुळे रुग्णांना मृत्यूपासून वाचवता येणे शक्य असल्याने हे संशोधन स्तन कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे. दहा वर्षांत रुग्णालयात स्तन कर्करोगावर उपचार घेणा-या ८५० स्तन कर्करोगांच्या महिलांना योगसाधनेचा फायदा झाल्याचे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.

(हेही वाचा – मुंबईत पारा घसरला! तर दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील हवेचा कसा आहे दर्जा?)

शनिवारी टाटा मेमोरियल रुग्णालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संशोधनाबाबत जागतिक पातळीवरही आता दखल घेतली गेल्याची मिळाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या अमेरिका येथे आयोजित सॅन अँटेनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियम या परिषदेत टाटा रुग्णालायाच्या डॉ नीता नायर यांनी हे संशोधन सादर केले. स्पॉटलाइट प्रेझेंटेशन या वर्गवारीत या संशोधनाला जागतिक स्तरावरही प्रशंसा मिळाली. २०१० ते २०२० या दहा वर्षांत स्तन कर्करोगामुळे केमोथेअरपी तसेच शस्त्रक्रियांना सामोरे गेलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी योगा करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर कोणता व्यायाम करायचा, याचाही खास कोर्स डॉक्टर्स, फिजिओथेअरपिस्ट, योगाचे प्रशिक्षण यांच्या देखरेखीत तयार करण्यात आला.

पहिले दोन-तीन महिने प्राणायाम आणि त्यानंतर विविध योगासने रोजच्या सरावासाठी रुग्णांना सूचवण्यात आली. या सरावाबाबतची माहिती डॉक्टर्स सातत्याने घेत होते. उच्च रक्तदाबासारख्या घातक आजारांपासून योगाच्या साधनेमुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. त्याच आधारावर आता स्तन कर्करोगाने त्रासलेल्या रुग्णांनाही योगा नवी संजीवनी देत असल्याची माहिती डॉ बडवे यांनी दिली. स्तन कर्करोगाच्या ज्या रुग्णांनी योगा सातत्याने सुरु ठेवला अशा रुग्णांची चार वर्षांत तब्येतीत बरीच सुधारणा दिसून आली, अशीही माहिती त्यांनी दिली. योगा ही कमी जोखमीची आणि कमी खर्चाची उपचारपद्धती आहे. स्तन कर्करोगाच्या रुग्णांनी योगा सातत्याने करावा, असा सल्लाही डॉ बडवे यांनी दिला.

स्तन कर्करोगाच्या रुग्णांनी योगा केल्यास होणारे फायदे

  • शारिरीक हालचालींना चालना मिळते. मानसिक आरोग्य सुधारते
  • केमोथेअरपीच्या दुष्परिणामांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच शारिरीक दुखणीही कमी होतात
  • रोगप्रतिकारकशक्ती सुधारते, असेही प्राथमिक निरीक्षण कर्करोगतज्ज्ञांनी नोंदवले. याबाबतीत संशोधनाला वाव असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.