मुंबईत १५०० इलेक्ट्रिक चार्जिग स्टेशन, चार्जिंग पॉलिसीबाबतची पहिली बैठक पडली पार

185

महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी सातत्याने केलेल्या विविध स्तरीय प्रयत्नांमुळे सध्या मुंबईत विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांची अर्थात ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ची संख्या वाढत आहे. येत्या आगामी वर्षांत मुंबईत तब्बल १५०० चार्जिंग स्टेशन बनवण्याचा संकल्प महापालिकेने केला असून याबाबतच्या धोरणात्मक बाबींबाबतची पहिली बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात पार पडली.

( हेही वाचा : तीन महिन्यांत इतकी रजा घेतली तर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार फिटनेस सर्टिफिकेट! )

‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग धोरण’

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी संबंधितांच्या पहिल्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत स्वतंत्रपणे ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग धोरण’ असावे, या उद्देशाने आयोजित या बैठकीमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग बाबत विविध साधक-बाधक मुद्यांवर सविस्तर अणि विविध अंगांनी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती पर्यावरण खात्याचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी दिली आहे.

१५०० चार्जिंग स्टेशन बनवली जाणार

पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहनांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या वाहनांची बॅटरी चार्ज करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र धोरण नसल्याने याबाबत गरजांनुरूप विविधस्तरीय अंमलबजावणी करण्यास मर्यादा येत आहे. ही बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्राथमिक बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेस्ट उपक्रम, महावितरण, टाटा पावर, अदानी इलेक्ट्रिसिटी, नरेडको, क्रेडाई, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट, सी ४० सिटीज इत्यादी संस्थांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती गोडसे यांनी या निमित्ताने दिली आहे.

चार्जिंग सेंटर बनवण्यासाठी त्यासाठी स्वतंत्र धोरणाची गरज असून त्यानुसार विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचाही अभ्यास करण्यात येत आहे. सन २०२३-२०२४ पर्यंत १५०० चार्जिंग स्टेशन बनवली जाणार असून सन २०२५नंतर या चार्जिंग सेंटरमध्ये वाढ होत जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.