धक्कादायक! मुंबईत रोज ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण

126

मुंबईत अल्पवयीन मुलीचे मोठ्या प्रमाणात अपहरण होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यानुसार मुंबई सारख्या मोठ्या शहरातून साधारण रोज ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  मागील दोन महिन्यात मुंबईतून १५६ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपहरण करण्यात आलेल्या पैकी केवळ ९४ मुलींचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली असून ६२ मुली अद्यापही बेपत्ता आहे.

नियम शिथिल होताच गुन्ह्याच्या आकड्यात वाढ

कोरोना या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील गुन्ह्यांचे प्रमाण बऱ्यापैकी घटले होते. मात्र लॉकडाऊनमधील नियम शिथिल करण्यात आल्यानंतर मुंबईत गुन्ह्याच्या आकड्यात वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतून दररोज सरासरी ३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. या अपहरणाच्या घटनेत बहुतांश गुन्हे फूस लावून पळवून घेऊन गेल्याचे असून त्यात साधारण १५ ते १७ वयोगटातील मुलींचा समावेश आहे. मागील १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या दोन महिन्याची गुन्ह्याची आकडेवारी मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींचे अपहर वाढले

या आकडेवारीत मागील दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींचे अपहरणाच्या घटनेत कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील विविध भागातून १५६ मुलींचे अपहरण करण्यात आले असल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे. अपहरण करण्यात आलेल्या बहुतांश मुलींचे प्रेमप्रकरणातून अपहरण करण्यात आलेले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अपहरण करण्यात आलेल्या १५६ मुलीपैकी ९४ मुलींची घरवापसी करण्यात पोलिसांना यश आले असले तरी अद्याप ही ६२ मुली या बेपत्ता असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.

(हेही वाचा – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी; पालिका निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन)

याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या अपहरणाच्या घटनेमागे सोशल मीडिया हे सर्वात मोठे कारण आहे, मुला मुलींच्या हातात स्मार्ट फोन आल्यामुळे सोशल मीडियावर मित्र मैत्रिणी बनवणे यासारखे प्रकार सुरू आहे, त्यात अनेक मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकून आईवडिलांना काही न कळवता पळून जाण्याचे पाऊले उचलतात, अशी माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.पळून जाणाऱ्या मुलींपैकी अनेक मुलींना आपली चूक लक्षात येताच त्या घरी परततात तर काही मुलीचा तांत्रिकरित्या शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका करण्यात येते अशी ही माहिती या अधिकारी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.