रविवारी मुंबईतल्या ‘या’ एकमेव भागात पडला दीडशे मिलीमीटरहून अधिक पाऊस

126
शनिवारपासून मुंबईत अभावानेच पडणा-या पावसाने रविवारी, 10 जुलै रोजी संपूर्ण मुंबईत केवळ हलक्या सरींसह हजेरी लावली. मुंबईभरात सायंकाळपर्यंत अभावानेच पावसाचे दर्शन झाले, मात्र एकट्या चिंचोळी अग्निशमन केंद्रात गेल्या सहा तासांत १६८.१४ मिमी पावसाची नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नजीकच्या परिसरात केवळ ४ ते ५ मिमी पाऊस झाला असताना चिंचोळी अग्निशमन केंद्रात नोंदवल्या गेलेल्या पावसाच्या मोजमापाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिंचोळी अग्निशमन केंद्र बनला चर्चेचा विषय

रविवारी मुंबईभरात कुठेही मुसळधार पाऊस झाला नाही, केवळ चिंचोळी अग्निशमन केंद्र येथेच पावसाचे प्रमाण वाढले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिंचोळी अग्निशमन केंद्रापासून जवळ असलेल्या मालाड अग्निशमन केंद्रात केवळ १.७७ मिमी पावसाची नोंद झाली. नजीकच्या मालवाणी अग्निशमन केंद्रात ४.३१ मिमी तर दिंडोशीत ४.५६ मिमी पाऊस झाला. सहा तासांत कांदिवली भागांत पावसाची नोंद झाली. त्यामुळे चिंचोळी अग्निशमन केंद्रातील पावसाची नोंद आता चर्चेचा विषय ठरली आहे. जवळपास संपूर्ण मुंबईत केवळ ५ मिमीपर्यंतच पावसाची नोंद दिसून आली आहे. कुलाबा परिसरात सायंकाळी साडे पाचपर्यंत ६.५ मिमी पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे ३.६ मिमी पाऊस झाला. कुलाब्यात कमाल तापमान २८.८ तर सांताक्रूझ येथे २९.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

आगामी आठवडाही पावसाचाच…

  • मुंबईत 14 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या सततच्या मा-याने कमाल तापमान २७ अंशापर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. 
  • ओडिशा राज्याच्या दक्षिण भागांपासून ते आंध्रप्रदेश राज्याच्या उत्तर भागांजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रासह हवेच्या वरच्या थरांत वा-यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे.
  • समुद्राच्या पृष्ठभागावरील ७.६ किलोमीटर लांब नैऋत्यभागाकडे वा-यांची चक्राकार स्थिती पसरली आहे. समुद्रातून येणारे बाष्प या वा-यांच्या चक्राकार स्थितीमुळे नैऋत्य भागाकडे खेचले जात आहे. मुंबईतील पावसासाठी होणा-या पोषक वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तसेच वा-यांची चक्राकार स्थिती या दोघांचाही प्रभाव आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.