मुंबई महापालिकेची मागील स्थायी समितीची सभा ही शेवटची मानली गेल्याने या सभेपुढे तब्बल १८० प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु समिती अध्यक्षांनी येत्या सोमवारी सभा आयोजित केल्याने या शेवटच्या सभेपुढे तब्बल २०२ प्रस्ताव सादर केले गेले आहे. यामध्ये अडीच ते पावणे तीन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. मागील सभेपुढे असलेल्या १८० रस्त्यांपैंकी ९८ कंत्राटाचे प्रस्ताव राखून ठेवण्यात आले होते, त्यामुळे या सभेपुढे मांडण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी कंत्राटाचे प्रस्ताव मंजूर केले जातात की पुन्हा राखून ठेवले जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
( हेही वाचा : … म्हणून विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी झालं स्थगित! )
प्रस्तावांमध्ये वाढ होण्याची शक्यता
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा येत्या ७ मार्च २०२२ रोजी शेवटची असून याच दिवशी महापालिकेच्या सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधीही संपुष्टात येत आहे. मात्र, अद्याप निवडणूक कार्यक्रमा जाहीर न झाल्याने येत्या ८ मार्चपासून महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या या प्रशासकाच्या हाती असणार आहे. त्यामुळे शेवटच्या सभेपुढे सर्व विभाग आणि खात्यांमधील विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहे. सोमवारी होणाऱ्या या सभेसाठी एकूण २०२ प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले असून अजून अतिरिक्त ५० प्रस्तावांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रस्तावांमध्ये दोन रुग्णलयांचे बांधकाम, पाण्याच्या जलबोगद्याचे बांधकाम, मलबारहिलमधील जलशयाच्या टाकीची पुनर्बांधणी यासह पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने नाल्यांचे बांधकाम व पेटीका नाल्यांचे बांधकाम, औषधांची खरेदी, रस्त्यांचे सिमेंट व डांबरीकरण, घनकचरा व्यवस्थापन, जलअभियंता विभागत तसेच आरोग्य विभागाच्या वास्तंचे बांधकाम अशाप्रकारच्या प्रस्तावांचा समावेश आहे. हे सर्व प्रस्ताव अडीच ते पावणे तीन हजारांच्रा आसपास असून सर्व प्रस्ताव पटलावर घेत विकासकामांच्या निविदा पूर्ण झालेल्या सर्व कामांचे प्रस्तावाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा करून ठेवला आहे.
मागील स्थायी समितीच्या सभेपुढे भाजप आक्रमकपणाचा अंदाज आल्याने समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्व कंत्राट कामांचे प्रस्ताव राखून ठेवत त्यांच्या आंदोलनाची हवाच घालवून टाकली होती. किंबहुना भाजपला घाबरुन सत्ताधारी पक्षाला हे प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत झाली नाही. परंतु सोमवारी होणारी स्थायी समितीची शेवटची सभा असून ही सभा होणार की नाही याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. समिती अध्यक्षांनी आपल्या निरोपाचे भाषण मागील सभेतच केल्याने या सभेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तसेच सभा झाल्यास हे प्रस्ताव मंजूर करत भाजपला अंगावर घेण्याची हिंमत सत्ताधारी पक्ष दाखवेल असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा येत्या होणाऱ्या सोमवारच्या सभेकडे असून एकाच सभेत प्रस्तावांचे द्विशतक मारत पटलाव घेतलेल्या प्रस्तावांमुळे समितीने प्रशासकाला आता कोणत्याही प्रस्तावाला मंजुरी देण्याचे कामच ठेवलेले नाही,असेही बोलले जात आहे.
अशाप्रकारे आहेत मंजुरीसाठी प्रस्ताव
कांदिवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : ५०९ कोटी
भांडुप- नाहूर प्रस्तावित रुग्णालय : ७६९ कोटी रुपये
नायर रुग्णालय : ३४८ कोटी रुपये
मलबारहिल टेकडी फिरोझशहा मेहता गार्डन जलाशयाची पुनर्बांधणी : ६९८ कोटी रुपये
मुंबईतील विविध ठिकाण पूर नियंत्रणाच्या कामासाठी उपसा करणारे पंप : १०० कोटी रुपये
पर्जन्य जलवाहिनी विभागाचे : २०० ते ३०० कोटींचे प्रस्ताव
इंजेक्शन व सेरा व्हॅक्सीनचा पुरवठा : ५० कोटी रुपये
सांताक्रुझ पश्चिममधील पेटीका वाहिन्यांचे बांधकाम : ३१ कोटी रुपये
खार पश्चिम आंबेडकर रोडवरील गुरुनानक दवाखान्याचा पुनर्विकास : ४० कोटी रुपये
एम पूर्वमधील छोट्या रस्त्यांचे सिमेंट क्राँकिटीकरण : ३३ कोटी रुपये
मिलन सब वे बांधकाम : ३३ कोटी रुपये
शहर परिमंडळ दोनमधील रस्त्यांची सुधारणा : २८ कोटी रुपये
परिमंडळ पाच मधील पेटीका नाल्यांची सुधारणा : २० कोटी रुपये
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पुलाच्या मोकळ्या जागेचे नुतनीकरण : १२ कोटी रुपये
पोयसर नदीला जोडणाऱ्या नाल्याचे उर्वरीत बांधकाम : १६ कोटी रुपये
देवनार कत्तलखाना पर्जन्य जलवाहिनी बदलणे : सुमारे १५ कोटी रुपये