१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष!

118

१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तानवर विजय संपादन करून पाकिस्तानी ९२ सहस्र सैनिकांना बंदी बनवले. इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या युद्धात शत्रूच्या सैनिकांना बंदी बनवण्याचा एक विक्रमच आपल्या पराक्रमी सैनिकांनी केला. पाकिस्तानची लांब पल्ल्याची गाझी नाव असलेली एक पाणबुडी आपल्या विशाखापट्टण या बंदरापासून काही अंतरावर पाकिस्तानच्या वतीने ठेवण्यात येणार असल्याची वार्ता आपल्या हेर खात्याकडून मिळाली. ही पाणबुडी तिथे ठेवण्यामागचा हेतू आपली विक्रांत युद्धनौका नष्ट करण्याचा असल्याचेही हेर खात्याने सांगितले. पाकिस्तानच्या गाझी या पाणबुडीला जलसमाधी देण्याचा निश्चय आपल्या आरमार दलाने केला.

अर्थात पाकिस्तान विक्रांत ही आपली विमानवाहू युद्धनौका उडविण्याचा प्रयत्न करणार ही गोष्ट ॲडमिरल एन्. कृष्णन यांच्या ध्यानात आली होतीच. हेर खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कयास खरा ठरला. व्हाइस एडमिरल एन्. कृष्णन हे युद्ध डावपेचातील तज्ञ म्हणून ओळखले जातात. दुसऱ्या महायुद्धात जर्मन नौदलाशी दोन हात करणाऱ्या अचिलेस आणि सफाॅक या ब्रिटिश युद्धनौकांवर प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव त्यांना घेता आला होता. अचिलेस ही युद्धनौका नंतर INS दिल्ली या नावाने आपल्या नौदलात समाविष्ट करण्यात आली. व्हाइस एडमिरल एन्. कृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली गाझी या पाकिस्तानी पाणबुडीला जलसमाधी देण्याची रणनीती आखण्यात आली.

(हेही वाचा -1971 विजय दिवस: …म्हणून ‘भारत’ धावला बांगलादेशाच्या मदतीला)

विशाखापट्टण बंदरात शिरण्यासाठी किंवा या बंदरातून बाहेर पडण्यासाठी आपल्या आरमाराला नैसर्गिकरित्या अरुंद आणि अवघड असा एक जलमार्ग आहे. हा जलमार्ग म्हणजे गाझी पाणबुडीला सुरंग पेरुन जलसमाधी देण्याला निमंत्रण देणारा जलमार्ग ठरेल असा विचार करण्यात आला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हाइस एडमिरल एन्. कृष्णन यांनी आपल्या सैनिकांसमोर विजयाचे ध्येय ठेवले.‌ हा विजय संपादन करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. विशाखापट्टणम येथे असलेल्या आपल्या युद्धनौकांना गाझी या पाणबुडीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. त्याचबरोबर रसद पुरवणाऱ्या आपल्या नौकांच्या हालचाली शत्रूला टिपता येणार नाहीत याचीही काळजी घेतली गेली. विक्रांत या आपल्या विमानवाहू युद्धनौकेचे रक्षण करणे ही सर्वात महत्त्वाची कामगिरी होती. तिचे रक्षण करून शत्रूची पानबुडी नष्ट करणे हे ध्येय आपल्या आरमार दलाचे होते. आपल्या आरमारी काफिल्याला अंदमान द्वीपसमूहातील एका गुप्त ठिकाणी दबा धरून बसण्यास सांगण्यात आले. हे ठिकाण आपल्या देशाच्या मुख्य भूमीपासून सुमारे १३०० किलोमीटर अंतरावर होते. जोपर्यंत हल्ला करण्याचा आदेश दिला जात नाही तोपर्यंत या काफिल्याला सांगितलेल्या ठिकाणी दबा धरून बसायचे होते.

विनाशक नावाची पाणबुडी होती सज्ज

गाझी या पाकिस्तानच्या पाणबुडीचा विशाखापट्टणम बंदराचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपली विनाशक नावाची पाणबुडी त्यासाठी सज्ज होती. या हालचाली चालू असताना आपले आरमार दूर अंतरावर अत्यंत सुरक्षित होते. पाकिस्तानच्या गाझी या पाणबुडीने भारतीय युद्ध नौका नष्ट करण्यासाठी ३ डिसेंबर १९७१ या दिवशी समुद्राच्या पाण्यात ३० मीटर खोलीवर आणि १५० मीटर अंतराने सुरुंग पेरण्याचे काम करण्यास प्रारंभ केला. ते ते काम करताना गस्त घालणाऱ्या भारतीय नौकांना आपल्या कामाची चाहूल लागू नये म्हणून गाझी पाणबुडी माघारी गेली. नंतर रात्रीच्या अंधारात पुन्हा सुरुंग पेरण्यासाठी गाझी पाणबुडी सिद्ध झाली. पण स्वतःनेच समुद्राच्या पाण्यात पेरलेल्या सुरुंगांच्या संपर्कात गाझी पाणबुडी आल्याने स्फोट होऊन तिला जलसमाधी मिळाली. अशी थांप पाकिस्तान कडून मारण्यात आली. वास्तविक गाझीचा सामना करण्यासाठी आपल्या आरमाराकडून आय एन एस राजपुताना या दुसऱ्या महायुद्धातील जहाजाचा वापर करण्यात येणार होता. एकदा विक्रांत सुरक्षित ठिकाणी पोहोचली की आय एम एस राजपुताना त्याच्या स्थानात वर जाऊन पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या अत्यंत जुन्या जहाजाचा वापर एका अत्याधुनिक पाणबुडीच्या विरोधात करण्यात आला.

…आणि गाझीला जलसमाधी मिळाली

आय एन एस राजपूताना वरून कायम संदेशाची देवाणघेवाण करण्यात येत होती. त्यामुळे पाकिस्तानला वाटले हे जहाजच विक्रांत आहे. या संदेशामुळे पाकिस्तान भ्रमित झाला. गाजी हळूहळू आय एन एस राजपुतानाच्या दिशेने सरकू लागली. राजपुताना पाठवत असलेल्या सिग्नलचाच पाठवला गाझी करत होती. काही क्षणात गाझी राजपुतानाच्या समोर येऊन उभी राहिली. राजपुताना वरील कॅप्टन इंदर कुमार यांनी यावेळी नेतृत्व करून आपल्या जहाजावरील नेव्हिगेशन सिस्टीमला बंद केले. आता समोरासमोर टक्कर होणार होती. राजपुतानाच्या सोनार सिस्टीम वर एक पाणबुडी असल्याची माहिती मिळाली होती. इंदर कुमार यांनी तातडीने गाझीवर दोन मिसाइल डागण्याचा आदेश दिला. राजपुताना जहाजावरून दोन मिसाईल डागण्यात आले. क्षणात मोठा धमाका उडाला आणि गाझीला जलसमाधी मिळाली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ डिसेंबर १९७१ या दिवशी विशाखापट्टणमच्या समुद्रात भारतीय युद्धनौकांना गाझी पाणबुडीचे अवशेष सापडले. त्याच बरोबर तीन पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह हाती लागले.‌ अखेरीस ९ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तानच्या गाझी पाणबुडीला जलसमाधी मिळाल्याची अधिकृत वार्ता, प्रसिद्ध झाली. त्याच बरोबर या पाणबुडीतील ९० पाकिस्तानी सैनिकांनाही जलसमाधी मिळाल्याचे घोषित करण्यात आले. भारतीय युद्धनौकेला जलसमाधी देण्याच्या नादात पाकिस्तानची गाझी पाणबुडी स्वतः जलसमाधी घेऊन मोकळी झाली. केले तुका आणि झाले माका ही म्हण अशाप्रकारे सार्थ झाली. भारतीय आरमार दलाने चितगाव आणि कॉक्सबझार या पूर्व पाकिस्तानच्या बंदरांवर हल्ला करून ती बंदरे पूर्णपणे उद्ध्वस्त केली. पूर्व पाकिस्तानची संपूर्ण सागरी नाकेबंदी करण्यात आपल्या सैन्याला यश मिळाले‌. आपल्या आरमाराने पाकिस्तानचा सागरी मार्ग रोखल्यामुळे स्थलसेनेने चपळाई करून पूर्व पाकिस्तानवर विजय संपादन केला. त्यावेळी पाकिस्तानच्या ९२ सहस्र सैनिकांना जिवंत पकडण्यात आणि त्यांना युद्धबंदी बनवण्यात आले.

आपल्या सैन्यदलांचा हा विजय हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवला गेला आहे. या विजयाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आपला हा विजयोत्सव आपण तेवढ्याच उत्साहाने साजरा करून हा विजयाचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. ते आपल्या सर्वांचेच राष्ट्रकार्य आहे. आपल्या तिन्ही दलाला या सुवर्ण महोत्सवी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा! आणि त्यांच्या शौर्याला, पराक्रमाला मानाचा मुजरा!

पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा पाकिस्तानने सोडला

पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य हिंदुस्थानने केले. त्यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगला देश या नावाने जगात अस्तित्वात आला. बांगलादेशाने आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कृतघ्नतेने वागत राहिला. आपल्या देशाचे स्वातंत्र्य धोक्यात यावे म्हणून बांगलादेशातील घुसखोर प्रयत्न करत आहेत. आपल्या त्यावेळच्या सरकारने या ९२ सहस्त्र पाकिस्तानी सैनिकांची कोणत्याही अटीविना मुक्तता केली. त्याऐवजी आपल्या सरकारने पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा पाकिस्तानने सोडला आणि आपल्या ५५ वीर सैनिकांची मुक्तता केली तरच पाकिस्तानच्या ९२ सहस्त्र सैनिकांची मुक्तता करण्यात येईल, अशी अट पाकिस्तान सरकारला घातली असती तर चित्र बदलले असते. पण तसे करण्यात आलेले नाही. या युद्धात पाकिस्तानने आपल्या ५५ वीर सैनिकांना युद्धबंदी बनवले. त्यांची मात्र पाकिस्तानने आजच्या क्षणापर्यंत मुक्तता केली नाही. या ५५ वीरांविषयी कोणतीही माहिती आजपर्यंतआपल्याला उपलब्ध झाली नाही. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या या विजयोत्सवाला अशी दुःखाची झालर आहे.

  • (दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते आणि लेखक)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.