1971 विजय दिवस: …म्हणून ‘भारत’ धावला बांगलादेशाच्या मदतीला

116

1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. 1965 नंतर भारताकडून पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय जगाच्या नकाशावर आणखी एका देशाचा जन्म झाला, पण प्रश्न असा पडतो की, पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या 24 वर्षानंतरच त्याचे तुकडे का झाले? त्याचा काही भाग वेगळा होऊन बांगलादेश का निर्माण झाला? बांगलादेशच्या जन्माची कहाणी 1971 मध्येच सुरू झाली की त्याची बीजेही 1947 मध्येच पेरली गेली आणि भारताने या लढ्यात केवळ बांगलादेशाला मदत करण्यासाठी उडी घेतली की त्यामागे आणखी काही हेतू होता? विजय दिवसाच्या 50 सुवर्ण महोत्सवानिमीत्ताने काही गोष्टी जाणून घेऊया.

1950 मध्येच फाळणीचा पाया रचला 

भारत-पाकिस्तान यांच्यातील दुसरे युद्ध आणि बांगलादेशच्या जन्माबाबत जेव्हा कधी चर्चा होते तेव्हा प्रथम 1971 या वर्षाचा उल्लेख केला जातो, परंतु बांगलादेशच्या निर्मितीचा पाया एक प्रकारे भारत-पाकिस्तान फाळणीनंतरच रचला गेला होता. हे फार कमी लोकांना माहीत आहे. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली अस्मिता आणि तिची ओळख यावरून जातीय संघर्ष सुरू झाला होता, पण खरी सुरुवात १९५० मध्ये झाली. खरे तर तेच वर्ष होते, जेव्हा भारताने आपली राज्यघटना लागू केली आणि पाकिस्ताननेही त्याची तयारी सुरू केली होती. त्याचवेळी पूर्व पाकिस्तानात राहणाऱ्या बंगालींनी बंगाली भाषेला योग्य दर्जा मिळावा या मागणीसाठी चळवळ सुरू केली. काही दिवसांनी हे आंदोलन संपले, पण त्यात मांडलेल्या मागण्या हळूहळू वाढत गेल्या.Add New

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील संबंध सतत बिघडत गेले

भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यापासून पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम भागात राहणाऱ्या लोकांमध्ये दुरावा वाढत होता. हा संघर्ष केवळ वेगवेगळ्या प्रदेशात राहण्यामुळे नव्हता, तर भाषा, संस्कृती, राहणीमान आणि विचारांच्या आधारेही होता. अशा परिस्थितीत शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी सहा कलमी कार्यक्रमही जाहीर केला. या सगळ्या कारवायांमुळे ते आणि इतर अनेक बंगाली नेते पाकिस्तानच्या निशाण्यावर आले. पाकिस्तानने दडपशाहीच्या धोरणाखाली शेख मुजीबुर रहमान आणि इतरांवर खटला चालवला.

 ( हेही वाचा: भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर! खरं कोण विराट की गांगुली? )

1970 च्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे झालेली शेवटची जखम

1950 मध्ये सुरू झालेली चळवळ पश्चिम पाकिस्तानने दडपून टाकली , पण पूर्व पाकिस्तानात राहणाऱ्या बंगालींच्या मागण्या सोडवल्या नाहीत. त्यामुळेच हा तणावाचा काळ हळूहळू 1970 पर्यंत पोहोचला. वर्ष संपत आले होते आणि पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या होत्या. शेख मुजीबुर रहमान यांनी त्या काळात आपली लोकप्रियता सिद्ध केली आणि पूर्व पाकिस्तानी अवामी लीग या त्यांच्या राजकीय पक्षाने पूर्व पाकिस्तानातील 169 पैकी 167 जागा जिंकल्या. यामुळे 313 जागांच्या पाकिस्तानी संसदेत सरकार स्थापन करण्यासाठी मुजीबूर रहमान यांच्याकडे प्रचंड बहुमत होते, परंतु पश्चिम पाकिस्तानवर राज्य करणाऱ्या जनतेने त्यांचा राजकारणातील हस्तक्षेप मान्य केला नाही. यामुळे पूर्व पाकिस्तानातील लोकांची नाराजी वाढली आणि त्यांनी चळवळ सुरू केली.

 जगाच्या नकाशावर नवा देश उदयाला आला

पूर्व पाकिस्तानात सुरू झालेला पाकिस्तानी सैन्याचा अत्याचार सातत्याने वाढत होता. मार्च 1971 मध्ये पाकिस्तानी सैन्याने बर्बरतेची प्रत्येक सीमा ओलांडली. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलांवरील बलात्कारासारख्या घटना सामान्य झाल्या. अशा परिस्थितीत पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या निर्वासितांची संख्या वाढू लागली आणि भारतावर पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा दबावही वाढला. अशा परिस्थितीत मार्च 1971 च्या अखेरीस भारत सरकारने पूर्व पाकिस्तानच्या मुक्तीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, मुक्तिवाहिनी ही पूर्व पाकिस्तानातील लोकांनी तयार केलेली सेना होती, ज्याचा उद्देश पूर्व पाकिस्तानला मुक्त करणे हा होता. 31 मार्च 1971 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय संसदेत या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. 29 जुलै 1971 रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या सैनिकांना मदत करण्याची जाहीर घोषणा करण्यात आली. मात्र, त्यानंतरही अनेक महिने दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरूच होते. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ले केले, तेव्हा भारतालाही युद्धाची घोषणा करावी लागली. अवघ्या 13 दिवसांनंतर, म्हणजेच 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पण केले आणि  बांगलादेश हा जगाच्या नकाशावर नवा देश म्हणून उदयाला आला. तथापि, बांगलादेश अजूनही 26 मार्च रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो, कारण याच तारखेला 1971 मध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानचे स्वातंत्र्य घोषित केले होते.

 ( हेही वाचा: बैलगाडा शर्यत होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.