भारतासह ‘हे’ ३० देश बनले ओमिक्रॉनचे शिकार!

कर्नाटकात परदेशातून दोन जण भारतात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. आता ओमिक्रॉनचा अहवालही सकारात्मक आला आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. अशी माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

भारत ३० वा देश

ओमिक्रॉनचे रुग्ण सर्वात प्रथम २४ नोव्हेंबर २०२१ रोजी, दक्षिण आफ्रिका या देशात आढळले. दक्षिण आफ्रिकेतूनच ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट जगभरातील २९ देशात पसरला गेला व भारत हा ३० वा देश असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी भारताने खबरदारीपूर्व उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे.

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन प्रकाराची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे, आम्ही त्याच्या आधारावर निर्णय घेऊ. आमच्या वैज्ञानिक वर्तुळात याबाबत सतत चर्चा केली जात आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी स्पष्ट केले. भारत १५ डिसेंबर रोजी व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणार होता, परंतु बुधवारी ती योजना रद्द केली आणि पुन्हा सुरू होण्याची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल असेही सांगितले.

( हेही वाचा : धक्कादायक! महाराष्ट्राच्या सीमेवर धडकला ओमिक्रॉन )

ओमिक्रॉनचा फैलाव

सद्यस्थितीत जगात भारतासह ३० देशात ओमिक्रॉनचे ३७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे सर्वाधिक १८३, बोट्सवानामध्ये १९ रुग्ण, नेदरलँडमध्ये १६ रुग्ण आहेत. तर या यादीत २९ व्या क्रमांंकावर अमेरिका असून येथे ओमिक्रॉनचा १ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. या देशांच्या यादीत आता भारताचादेखील समावेश झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here