वीस दिवसांची बिबट्याची पिल्ले आईपासून दुरावली; ३६ तासांच्या आत आई आणि बछड्यांची झाली भेट

सातारा येथील कराड येथे वनमासमाची येथील उसाच्या शेतात सोमवारी दुपारी तीन बिबट्याची बछडी शेतक-यांना आढळली. वनाधिका-यांनी घटनास्थळी पाहणी करुन त्यांना अगोदर ताब्यात घेतले. मात्र बछड्यांची आई शेतात आढळून न आल्याने सलग ३६ तासांत बिबट्यांच्या तिन्ही बछड्यांचे आईशी मिलन घडवून देण्याचे यशस्वी ऑपरेशन वनाधिका-यांनी राबवले. केवळ २० दिवसांच्या बछड्यांना आईच्या दूधाविना जास्त दिवस ठेवण्यात कित्येकदा जिकरीचे होऊन बसते. कित्येकदा बछडे दगावण्याचीही भीती असते. अशातच बछड्यांच्या तब्येतीची काळजी घेत तिघांचेही आईशी शेतातच वनाधिका-यांची भेट घडवून आणली.

सोमवारी तिन्ही बछड्यांना ताब्यात घेतल्यानंतर वनाधिका-यांनी तातडीने अगोदर त्यांची पशुवैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी करुन घेतली. सोमवारी तिघांनाही आईकडून दूध मिळाले असल्याने बछडे भुकेले नव्हते. त्याचदिवशी बछड्यांची आईशी भेट घडवून आणण्याचा निर्णय वनाधिका-यांनी घेतला. त्यानुसार पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेने शेतात कॅमेरा ट्रेप बसवले.

सोमवार सायंकाळपासून भेट घडवण्याचा प्रयत्न सुरु 

सोमवारी सायंकाळी सात वाजता शेतात एका क्रेटमध्ये वनाधिका-यांनी तिन्ही बिबट्यांची बछडे ठेवली. अंधार गडद होताच २२ तारखेला पहाटे तीन वाजता मादी बिबट्या बछड्यांच्या शोधात संबंधित जागेजवळ येऊन पोहोचली. तिघांपैकी एका बछड्याला ती घेऊन गेली.

मंगळवारी मिलनाचा दुस-यांदा प्रयत्न 

मंगळवारी पहाटे एक बछडा मादी बिबट्याने नेल्यानंतर उरलेल्या दोन्ही बछड्यांना वनाधिकारी कार्यालयात घेऊन आले. दोघांनाही दूध पावडर आणि द्रवाच्या मिश्रणातील दूध पाजण्यात आले. सायंकाळी दोघांनाही पुन्हा शेतात क्रेटमध्ये वनाधिका-यांनी ठेवले. साडेसहा वाजताच त्याच जागी क्रेट ठेवली असल्याने मादी बिबट्या पुन्हा आली. एका बछड्याला घेऊन गेली. २३ तारखेला पहाटे  २.५५ मिनिटांनी तिने शेवटचा तिसरा बछडाही सोबत नेला.

( हेही वाचा: वीजेच्या धक्क्याने दोन सारस पक्षांचा मृत्यू )

कार्यवाहीचे पथक – 

ही कार्यवाही सातारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनीकरण व कॅम्प विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत कराड येथील वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सांगर कुंभार, वनरक्षक दिपाली अवघडे, अरविंद जाधव, सचिन खंडागळे, अभिजीत शेळके, अनिक कांंबळे, शंभूराज माने, योगेश बडेकर, हणमंत मिठारे तसेच रेसक्यूटीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here