मुंबई ते अहमदाबाद बुलेट मार्गाच्या टप्प्यात येणा-या ठाणे खाडीतील फ्लेमिंगो तसेच इतर पक्ष्यांच्या अधिवासावर प्रकल्प सुरु झाल्यानंतर होणा-या परिणामाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय वने, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या करिता राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने २०० पक्ष्यांना रेडिओ कॉलरिंग करण्यासाठी वनविभागाला ९.९२ कोटींचा निधी देऊ केला आहे. या निधीचा वापर करत वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने पुढच्या वर्षी मे महिन्यापासून २० वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांना रेडिओ कॉलरिंग करुन अधिवासामुळे पक्ष्यांवर होणा-या परिणामांचा अभ्यास करणार आहे.
( हेही वाचा : प्राथमिक आरोग्य सुविधेच्या बळकटीकरणासाठी महापालिकेचा कृती आराखडा)
२०० पक्ष्यांना एकाचवेळी रेडिओ कॉलरिंग लावले जाणारा देशातील हा पहिलाच महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. सोमवारी वनविभागाच्या कांदळवन कक्ष तसेच बीएनएचएसमध्ये या प्रकल्पाकरिता सामंजस्य करार झाला. या प्रकल्पासाठी ५ कोटी २९ लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा अधिका-यांनी व्यक्त केली. सुरुवातीला प्रकल्पासाठी ४.५४ कोटी रुपये कांदळवन प्रतिष्ठानकडून दिले जातील. महिन्याअखेरिस निधी उपलब्ध झाल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत आवश्यक साधने खरेदी केली जातील. ठाणे खाडीतील स्थलांतरित पक्षी पावसाळ्यात उड्डाण करण्याअगोदर त्यांना टप्प्याटप्प्याने रेडिओ कॉलरिंग केले जाईल. तीन वर्ष हा अभ्यास केला जाईल. अधिवास व पक्ष्यांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास केल्यानंतर बीएनएचएसचे शास्त्रज्ञ आपला अहवाल सादर करतील.
२० पक्ष्यांच्या प्रजातीमध्ये स्थानिक, देशातील विविध राज्यांतून तसेच परदेशातून येणा-या पक्ष्यांना रेडिओ कॉलरिंग करण्याची शास्त्रज्ञांची योजना आहे. काही पक्षी पुढच्या वर्षी हिवाळ्यात आल्यानंतर रेडिओ कॉलर केले जातील. यात दुर्मिळ पक्ष्यांना रेडिओ कॉलरिंगसाठी ध्यानात घेतले जाईल, असेही शास्त्रज्ञांच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community