नवीन वर्षात मोठी दुर्घटना: नर्सिंग होमला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

108

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्लीत मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीतील एका नर्सिंग होमला 1 जानेवारीला सकाळीच भीषण आग लागली. बघता बघता आग पसरली. त्यामुळे एकच हाहाकार माजला. रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांची एकच धावपळ उडाली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आगीत अनेकजण अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आतापर्यंत सहा जणांची सुटका केली आहे. अजून काही लोकांची सुटका करण्यात येत असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आधी भूकंपाचे धक्के आणि आता आग लागल्याने दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

1 जानेवारीला पहाटे सव्वा पाच वाजता ग्रेटर कैलाश-2 मधील सिनियर सिटीजन केअर होम या नर्सिंग होमला ही आग लागली. पहाटे सर्वजण झोपेत होते. नर्सिंगमधला स्टाफ आणि रुग्णही झोपेत होते. त्यावेळी आग लागल्याने सुरुवातीला कुणाला काहीच कळले नाही. मात्र, जशीजशी आग तीव्र होत गेली आणि गरम वाफा येऊ लागल्या तेव्हा  रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

( हेही वाचा: नवं वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली- हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिक्टर स्केल तीव्रता )

रुग्णालयात सर्च ऑपरेशन सुरु

दीड तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, अजूनही आगीच्या ज्वाळा निघताना दिसत असून, धूरही निघत आहे. लवकरच ही आग पूर्णपणे विझवली जाणार आहे. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे. सध्या आग पूर्णपणे विझवण्याबरोबरच रुग्णालयात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.