मोठी कारवाई : रायगडमधून 1 हजार 725 कोटींचे 22 टन हेराॅईन जप्त

रायगडमधील उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरामधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तब्बल 1 हजार 725 कोटी रुपयांचे 22 टन हेराॅईन बुधवारी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. आतापर्यंतच्या अनेक मोठ्या कारवायांपैकी ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.

मागच्या दोन-तीन दिवसांपासून उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरात अनेक कारवाया केल्या जात आहेत. सीआयओने दोन दिवसांपूर्वी रक्त चंदनाच्या तस्करी संदर्भात कारवाई केली होती आणि त्यामध्ये जवळजवळ अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. आता बुधवारी तशीच एक मोठी कारवाई करत न्हावाशेवा बंदरातून 1 हजार 725 कोटींचे 22 टन हेराॅईन जप्त करण्यात आले आहे.

( हेही वाचा: Patra Chawl Case: राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला PMLA कोर्टात सुनावणी )

स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून 22 टन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या मालाची किंमत सुमारे 1 हजार 725 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मुंबईत कोणी मागवले याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.

गुप्त माहितीवर आधारित कारवाई

काही दिवसांपूर्वी स्पेशल सेलने 1200 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले होते. यावेळी दोन अफगाण नागरिकांना अटक करून नार्को टेररचा मोठा कट उधळून लावल्याचा दावाही स्पेशल सेलने केला होता. चौकशीत अफगाण नागरिकांनी मुंबई बंदरातील कंटेनरमध्येही अमली पदार्थ असल्याचे उघड केले होते. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक तपासासाठी मुंबईत पोहोचले आणि या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून 1 हजार 725 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here