पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक शिवाई एसटी बस सुरू झाल्यानंतर येत्या काही दिवसांत एसटीच्या ताफ्यात आणखी १७ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यासाठी पुण्यात २३ चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १७ चार्जिंग स्टेशन विभागीय कार्यालय आणि सहा चार्जिंग स्टेशन पुणे स्टेशन येथे उभारण्यात येणार आहेत.
पुण्यात लवकरच २३ चार्जिंग स्टेशन
राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वर्धापनदिनी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक शिवाई बस सुरू करण्यात आली. सध्या पुण्याहून नगर आणि नगरहून पुणे अशा दोन शिवाई बसच्या दिवसाला चार फेऱ्या होत आहेत. त्यामधून दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहेत. शिवाई ई-बसमध्ये अनेक चांगल्या सुविधा असल्यामुळे दिवसेंदिवस या बसेसला प्रतिसाद वाढत आहेत. पहिल्या टप्प्यात परिवहन महामंडळ ३०० इलेक्ट्रिक बस घेणार आहे. त्यापैकी १७ बस येत्या काही दिवसांमध्ये दाखल होणार आहेत.
( हेही वाचा : ‘बेस्ट’मध्ये कायमस्वरुपी कर्मचारी भरती करणे आवश्यक)
महामंडळाकडे १७ इलेक्ट्रिक बस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या मार्गांवर त्या सुरू केल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बस दाखल होत असल्यामुळे स्वारगेट येथील विभागीय कार्यालयात १७ नवीन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातील चार्जिंग स्टेशनची संख्या २३ होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक बसची सेवा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.