धार्मिक पक्षपात करणाऱ्या MPCB च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, हिंदु जनजागृती समितीची मागणी

153

केवळ हिंदूंच्या विविध सणांवेळी ‘किती ध्वनीप्रदूषण होते’ याचे अनेक अहवाल प्रदूषण मंडळ दरवर्षी प्रकाशित करते; मात्र वर्षातील 365 दिवस मशिदींवरून भोंग्याद्वारे, तसेच मुस्लिमांच्या अन्य सणांवेळी होणाऱ्या प्रदूषणाविषयी एकही अहवाल प्रकाशित केला जात नाही. या धार्मिक पक्षपाताचा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

7 वर्षांच्या कालावधीत 230 खटले

वर्ष 2015 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत ध्वनीप्रदूषणाबाबत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर 230 खटले दाखल केले आहेत. तर मुस्लिमांवर केवळ 22 खटले दाखल आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. अशा प्रकारे पक्षपाती कारवाई करून केवळ हिंदूंना बदनाम करणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी केली.

ध्वनीप्रदूषणाबाबत देशभरातील नागरिकांनी उठवला आवाज

खाडये पुढे म्हणाले की, गेल्या 7 वर्षांत महाराष्ट्रातील ध्वनीप्रदूषणाविषयी एकूण 252 खटले दाखल झाल्याची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात मिळाली. यांतील 230 खटले हे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव साजरे करणारी मंडळे, संघटना अथवा कार्यकर्ते यांच्यावरच झालेले दिसतात. मुळात दिवसांतून पाचवेळा मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांनी जोरदार आवाज उठवला आहे; मात्र या ध्वनीप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसून येते.

(हेही वाचा – CWG 2022: भारताची पदकसंख्या १४ वर, लवप्रीत सिंगने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्य!)

गणेशोत्सव, दिवाळी सण आला की, प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यातील 27 जिल्ह्यांतील 290 ठिकाणी ‘ध्वनीमापन यंत्र’ घेऊन ‘ध्वनीप्रदूषण किती झाले’ ते मोजते. तसेच ‘वायू आणि जल प्रदूषण किती झाले’, तेही मोजते. राज्यभरात दिवाळीच्या कालावधीत ध्वनी आणि वायू याचे दर तासाला निरीक्षण नोंदवले जाते. दरवर्षी याचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून मंडळाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येतो. वर्ष 2015 पासून असे अहवाल उपलब्ध आहेत. पण वर्षभर प्रतिदिन मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे सर्वेक्षण मंडळ का करत नाही ? बकरी ईदला प्राणी-हत्येमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाचे निरिक्षण का नोंदवत नाही? त्याचे अहवाल का तयार केले जात नाहीत? मध्यंतरी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यावर मुंबईतील जवळपास 843 हून अधिक मशिदींवरील भोंग्यांना अनुमती देण्यात आल्याची माहिती आहे. याचा अर्थ हे भोंगे यापूर्वी अनधिकृत होते ! तर मग प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही? असा धार्मिक पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत, असेही खाडये म्हणाले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक सागर चोपदार, हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’च्या वतीने अभिषेक मुरूकुटे हेही उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.