मुंबईतील २४ हजार क्षयबाधितांना हवेत ‘निक्षय मित्र’

186

क्षयरोगबाधितांच्या उपचारांना तसेच देखभालीसाठी आर्थिक साहाय्य करत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात निक्षय मित्र या योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेला प्रतिसाद देत मुंबईतील ४० हजारांपैकी सात हजार क्षयरोग बाधितांना आपल्या आजारपणात काळजी घेण्यासाठी निश्चय मित्र मिळाला आहे. या योजनेत माजी नगरसेवक, कॉर्पोरेट कंपन्या तसेच समाजसेवकांनीही सहभाग नोंदवत वार्डनिहाय रुग्णांचे संगोपन करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. अद्यापही २४ हजार क्षयरोगबाधित रुग्ण निक्षय मित्राच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियान या योजनेंतर्गत समाजातील विविध घटक म्हणजेच दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सोसायट्या, औद्योगिक तसेच राजकीय संस्था या निक्षय मित्र म्हणून क्षयरुग्णांना मदत करु शकतात. या योजनेचे राज्यात १७ सप्टेंबर रोजी राज्यपालांनी उद्घाटन केले होते. या योजनेच्या अंमलबजावणीपासूनच केंद्राकडून आर्थिक परिस्थितीत हलाखीची असणा-या क्षयरोगबाधितांना दर महिन्याला पाचशे रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. परंतु दीर्घकालीन आजारपणात कित्येकदा रुग्णांचे आर्थिक गणित कोलमडते. कित्येकांना नोकरीही गमवावी लागते.

(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य भोवलं, शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल)

औषधोपचार तसेच सततच्या आजारपणाने घरातील आर्थिक डौलारा कोसळतो. रुग्णांना सातत्याने पोषक आहार द्यावा लागतो. या सर्व घटकांचा विचार ध्यानात घेत क्षयरोगबाधित रुग्णांना दर महिन्याला पोषक आहार देण्यासाठी किमान सहाशे ते नऊशे रुपयांचा किमान खर्च निक्षय मित्र पुरवठादाराच्या मदतीने उचलू शकतात, असे प्राथमिक स्तरावर योजनेचे स्वरुप आहे.

मुंबईतील ४० हजारांपैकी ३१ हजार क्षयरोगबाधितांनी निक्षय मित्राची गरज असल्याचे आम्हांला कबूल केले आहे. त्यापैकी ७ हजार क्षयरोगबाधितांना निक्षय मित्र मिळाले आहेत.इतर गरजू रुग्णांसाठी निक्षय मित्रांनी पुढाकार घ्यावा – डॉ मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य खाते

निक्षय मित्र योजनेचे स्वरुप

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानांतर्गत निक्षय मित्र ही योजना देशभरात कार्यान्वित करण्यात आली आहे. क्षयरोग बाधितांचा पोषक आहार, तपासण्यांचा खर्च, उपचाराकरिता खर्च किंवा गंभीर आजारातून बरे होण्यासाठी पूनर्वसन करण्याकरिता निक्षय मित्र मदत करु शकतात. निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षयबाधितांना मदत करु शकतात. किमान सहा ते तीन वर्ष क्षयबाधितांना मदत करता येते.

क्षयबाधितांना मदत करण्यासाठी 

  • हेल्पलाईन क्रमांक – १८००-११-६६६६
  • जिल्हा क्षयरोग अधिकारी – ८५९१५६८१०५ -वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत
  • ईमेल आयडी – [email protected]

मुंबईतील सर्वात जास्त क्षयरोगबाधित वॉर्ड

एम – ईस्ट , एफ साऊथ , टी नॉर्थ ,धारावी , जी नॉर्थ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.