भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी दादर चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजीपार्क) परिसरात मुंबई महापालिकेच्यावतीने विविध सेवा सुविधा पुरवण्यात आल्या. या सेवा सुविधा पुरवताना मुंबई महापालिकेने यावर्षांपासून प्रथमच भोजनाच्या वाटपाचेही केले. मात्र, याबरोबरच या विविध संस्थांसोबत समन्वय राखून त्यांच्या माध्यमातूनही आंबेडकर अनुयायांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले. महापालिकेने समन्वय राखून अनुयायांना जेवण, नाश्तासह इतर खाद्यपदार्थांच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी २५ संस्थांनी पुढाकार घेत तब्बल साडेचार लाख अनुयायांना खाद्यपदार्थ पुरवले.
(हेही वाचा – आंबेडकर अनुयायांसाठी ‘या’ भागातील महिलांनी बनवल्या १६,६५० चपात्या)
दरवर्षी ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोप-यातून आणि परदेशातून देखील असंख्य अनुयायी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना विविध नागरी सेवा-सुविधा महानगरपालिकेद्वारे समर्थपणे उपलब्ध करुन देण्यात येत असतात. यानुसार यंदा देखील तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अविश्रांत प्रवास करुन येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमी परिसरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर परिसरातील विविध ठिकाणी प्रसाधनगृहे, शौचालये, स्नानगृहे इत्यादी व्यवस्था देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना महानगरपालिकेद्वारे भोजन देखील उपलब्ध करुन देण्यात आले. या भोजन वाटपासाठी एक स्वतंत्र मंडप उभारण्यात आला होता. याशिवाय इतर २४ संस्थांनीही महापालिकेच्या माध्यमातून समन्वय राखून अनुयायांना पुलाव, चहा बिस्कीट, फळे, पाणी, चिवडा, बटाटा वडा, समोसे, पावभाजी, उपमा, इटली व चटणी आदींचे वाटप केले. तब्बल ४ लाख ४१ हजार ७५० अनुयायांनी या जेवणासह,नाश्ता व इतर खाद्यपदार्थांचा लाभ घेतल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी नोंदवलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे यंदा शिवाजीपार्क परिसरातील महापालिकेच्यावतीने पुरवलेल्या सेवा सुविधांबाबत आंबेडकर अनुयायांनी एकप्रकारे समाधान व्यक्त केले.
बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी कोणत्या संस्थांनी कशाप्रकारे पुरवली जेवण, नाश्त्याची सुविधा
- युनियन बँक ऑफ इंडिया एससी एसटी व समष्टी फाऊंडेशन : उपमा (१० हजार), वडा पाव (५००), बिस्कीट (०९ हजार), पुरी भाजी (१५हजार)
- बौध्द समाज सामाजिक संस्था : चहा व बिस्कीट(४० हजार), वडापाव (०५ हजार)पावभाजी (०२ हजार)
- चेंबूर आरसीएफ : चिवडा, बिस्कीट व पाणी (१४ हजार ८००)
- एचपीसीएल : पोहे, बिस्कीट आणि पाणी (१४ हजार)
- बीपीसीएल : चिवडा व पुलाव (१५ हजार)
- समता परिषद/पंचशील ट्रस्ट : चपाती व भाजी, पुलाव (२८ हजार)
- महापालिका ई विभाग : पोहे पाकीटे (१० हजार)
- बेस्ट उपक्रम : बटाटेवडे(१५ हजार), समोसे (०५हजार), चिवडा पाकीटे(०६ हजार), बिस्कीट(१८ हजार)
- मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघ व बौध्द सभा व मणेराजुरी बौध्द विकास व डेव्हलप मुव्हमेंट : पावभाजी (२६ हजार ५००)
- ऋणानुबंध : समोसे (५ हजार), पुलाव (साडेतीन हजार)
- ऑलइंडिया एससीएसटी रेल्वे एम्लॉईज असो,माटुंगा ईएमयू : सफरचंद, संत्री (९०हजार)
- आयसीआयसीआ : पुलाव व पाणी (३ हजार)
- गोरेगाव महानंद डेरी : छास,बिस्कीट, केळी (१५ हजार)
- श्री प्रेरणा संस्था : चहा व बिस्कीट (१ हजार ),पुलाव (१ हजार)
- अत्तदिप संस्था : इटली व चटणी (५ हजार), चिवडा (५ हजार), चहा (८ हजार)
- सोशल एज्युकेशन : चहा बिस्कीट (६००)
- मुंबई पोर्टस वर्कर : संत्री (१० हजार)
- मुंबई पोर्टस एससी, एसटी वेल्फेअर : केळी व बिस्कीट(१० हजार ५००)
- नालंदा वेल्फेअर असो : बिस्कीट व पाणी( दोन्ही दिवशी ३० हजार)
- मुंबई अग्निशमन दल : केळी व पाणी (०५ हजार), पुलाव (०४ हजार)
- डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल : चिवडा (७ हजार ५५०)
- असरोडी बौध्द सेवा मंडळ : चिवडा व बिस्कीट (०४ हजार)
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी : बिस्कीट (०८ हजार), सफरचंद (२ हजार ५००)
- इंडियन ऑईल रिझर्व्ह कॅटेगरीज /एमएमटीसी : बिर्याणी (२ हजार ८००)