मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनादरम्यान, शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतर शनिवारी मध्यरात्री मोठा राडा झाला. यावेळी दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट समोरासमोर भिडल्याचे दिसून आले. मध्यरात्री झालेल्या उद्धव गट -शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश असल्याची माहिती मिळतेय. मारहाण करण्यात आलेल्या शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – फक्त औरंगाबाद,उस्मानाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्यांचीही बदलली आहेत नावे)
दादर पोलीस स्थानकात शिवसैनिकांविरोधात वेगवेगळ्या 9 कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात संतोष तेलवणे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, शिंदे गट विरूद्ध उद्धव गट यांच्या झालेल्या राड्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काय केली होती तेलवणे यांनी तक्रार
शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जनादरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हॉट्सअपच्या पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. यावरून शिवसैनिकांनी तेलवणे यांना मारहाण केली होती. यानंतर तेलवणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गणेश विसर्जनाच्या दरम्यान प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाकडून गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावला होता. त्याच्या शेजारीच उद्धव ठाकरे यांच्या गटातील महेश सावंत यांनी देखील स्टॉल लावला होता. विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री वाद झाला होता आणि तो त्यावेळीच मिटला देखील होता.
परंतु, रविवारी मध्यरात्री झालेल्या वादाप्रकरणी शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास महेश सावंत यांच्यासह 20-25 कार्यकर्त्यांच्या हातात तलवार, चॉपर आणि इतर हत्यारे होती, अशी तक्रार तेलवणे यांनी केली आहे. यासह त्यांनी असेही म्हटले की, महेश सावंत यांनी शिवीगाळ केली आणि ते अंगावर धावून आले. सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. यादरम्यान, पोलीस आल्यानंतर झालेल्या धावपळीत गळ्यातील 30 ग्रॅम सोन्याची चैन पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली असल्याची तक्रार तेलवणे यांनी केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेननेचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडू, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे, रवी पड्याचील यांच्यासह इतर काही अज्ञातांविरोधात भारतीय दंड कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 आदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.