कोविड काळात मुंबई महापालिकेचे तब्बल २५४ कर्मचारी मृत पावले असून आतापर्यंत १२९ मृतांच्या नातेवाईकांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. तर ६० मृत कामगारांच्या नातेवाईकांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे आजवर मृत पावलेल्या ३० जणांच्या नातेवाईकांनी अद्यापही नोकरीसाठी अर्ज केले नाही.
मार्च २०२० कोविडने पालिकेतील एकूण २५७ मृत्यू
मुंबईमध्ये मार्च २०२० कोविडच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आजमितीस विविध विभागांमध्ये डॉक्टर, नर्सेस, महापालिकेचे अधिकारी, कामगार, कर्मचारी अशाप्रकारे एकूण २५७ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका सेवांमध्ये मृतांच्या वारसांना सामावून घेण्याची प्रक्रिया राबवली जात असून आजवर मृत पावलेल्या २५७ कामगारांपैंकी १२९ प्रकरणे मंजूर झाल्याने त्यांच्या वारसांना सामावून घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. तर ६० प्रकरणांमध्ये प्रक्रिया सुरु असल्याची आकडेवारी मिळत आहे. तर वारसा वादामुळेच १३ मृत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर वारस सज्ञान नसल्याने ०८ प्रकरणांमध्ये दावा राखून ठेवला आहे. तर तिसरे अपत्य असल्याने १७ प्रकरणांमध्ये नोकरीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
३० कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा नोकरीसाठी अर्जच नाही
३१ डिसेंबर २००१ रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास त्यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेता येत नाही. त्यामुळे १७ मृत कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य हे ३१ डिसेंबर २००१ नंतरचे असल्याने त्यांच्या वारसांना नियमानुसार सरकारी सेवांमध्ये सामावून घेतले जावू शकत नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ३० कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नोकरीसाठी अर्जच केला नसल्याचीही माहिती मिळत आहे.
या २५७ मृत कामगारांपैकी ०९ कामगार हे कंत्राटी असून त्यांना महापालिका सेवेत घेण्याचे कोणतेही धोरण नसल्याने याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नसल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून मिळत आहे. त्यामुळे ज्या ३० मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज प्राप्त झाले नाही, त्यांच्या नातेवाईकांनी पुढे येऊन हे अर्ज करावे, असे आवाहन केले जात आहे.