क्रिकेट विश्वात ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही, असे 80 च्या दशकातील एक महान क्रिकेटर रवी शास्त्री यांचा 27 मे शुक्रवारी वाढदिवस आहे. ते आज 60 वर्षांचे झाले. 1990 ते 2000 या काळात त्यांनी काॅमेंटेटरचे काम केले. त्यांनी आपल्या शानदार आवाजाने जगाला वेड लावले. युवराज सिंगने 6 चेंडूत मारलेले 6 षटकार असोत किंवा महेंद्रसिंग धोनीचे 2011च्या विश्वचषक फायनलमधील विजयी षटकार असोत, हे दोन्ही क्षण रवी शास्त्री यांच्या आवाजाच्या जादूमुळे कायमच लक्षात राहतील. एक ऑल राऊंडर क्रिकेटर, जगप्रसिद्ध काॅमेंटेटर आणि यशस्वी प्रशिक्षक असणा-या रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट विश्वात मोलाचे योगदान दिले आहे.
क्रिकेटर म्हणून शास्त्रींची कामगिरी
रवी शास्त्रींबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला तेव्हा ते केवळ 17 वर्षांचे होते. विशेष म्हणजे ते मुंबईतील सर्वात तरुण खेळाडू होते. रवी शास्त्री यांनी 21 फेब्रुवारी 1981 रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी संघात भरीव योगदान दिले. एकूण 80 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी 11 शतके आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 830 धावा केल्या, त्यासोबतच त्यांच्या नावावर 151 विकेट्सही आहेत. याशिवाय 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 3 हजार 108 धावा केल्या आणि 129 विकेट्स घेतल्या.
( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )
एक यशस्वी प्रशिक्षक
रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणूनही खूप यशस्वी ठरले, याचे श्रेय विराट कोहलीच्या कर्णधारपदाला जात असले तरी, 2017 मध्ये त्यांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आणि 2019 मध्ये त्यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला. रवी शास्त्री प्रशिक्षक असताना, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. याशिवाय भारताने दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका 5-1 अशी जिंकली. विराटच्या संघाने इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. एकंदरीत रवी शास्त्री यांच्यावर जी काही जबाबदारी देण्यात आली आहे, ती त्यांनी चोखपणे पार पाडली.
Join Our WhatsApp Community