कारवाईचा बडगा दाखवताच २८ वर्षांचा मालमत्ता कर वसूल!

महापालिकेच्या अशा प्रकारच्या अप्रिय कारवाईनंतर अनेक ठिकाणी मालमत्ता धारकांद्वारे कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणारा मालमत्ता कराच्या वसुलीचा धडाका आता प्रशासनाने सुरू केला आहे. या अंतर्गत वरळी परिसरात तब्बल २८ वर्षांपासून थकीत असलेला मालमत्ता कर महापालिकेने वसूल केला आहे. नॅशनल कॉटन प्रॉडक्ट यांच्याकडून २८ वर्षांचा थकीत ३ कोटी २२ लाख ५२ हजार ४५९ रुपये वसूल करण्यात महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे आणि त्यांच्या टीमला यश आले आहे. याशिवाय बोरिवली परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेनेही कारवाईच्या भीतीने कराचा भरणा केला आहे.

जोरदार कारवाई

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी रूपये मालमत्ता कर जमा करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य असून १६ मार्चपर्यंत ३ हजार ७०४ कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी विनंती करण्यात येत असून, त्यानंतरच्या टप्प्यात नोटिस देण्यात येत आहे. मात्र, जे मालमत्ता धारक वारंवार विनंती करुन व नोटिस पाठवून देखील मालमत्ता कर रकमेचा भरणा करत नाहीत त्यांच्याबाबत नाईलाजाने जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने-वातानुकूलन यंत्रणा यासारख्या महागड्या वस्तू जप्त करणे यासारखी कारवाई करण्यात येत आहे. तसेच विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास मालमत्ता कराच्या रकमेवर दरमहा २ टक्के यानुसार दंड आकारणी करण्यात येत आहे. या प्रकारच्या अप्रिय कारवाईनंतर अनेक ठिकाणी मालमत्ता धारकांद्वारे कर रकमेचा भरणा महापालिकेकडे करण्यात येत आहे.

(हेही वाचाः मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेद्वारे कारवायांचा धडाका!

जी दक्षिण विभाग कार्यक्षेत्रातील वरळी परिसरात ‘मे. नॅशनल कॉटन प्रॉडक्ट’ या नावाने कर निर्धारित असलेल्या ६ व्यावसायिक गाळ्यांचा मालमत्ता कर सन १९९२ पासून थकीत होता. ही रक्कम ३ कोटी ६१ लाख ४७ हजार ३८ रुपये इतकी होती. या अनुषंगाने कर निर्धारक व संकलक खात्याद्वारे धडक कारवाईचा बडगा दाखवताच संबंधितांनी ३ कोटी २२ लाख ५२ हजार ४५९ रुपये एवढ्या रकमेचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

जलजोडणी खंडित करताच…

आर मध्य विभाग कार्यक्षेत्रातील बोरिवली(पूर्व) परिसरात असणा-या ‘कृपाधाम’ गृहनिर्माण संस्थेकडे मालमत्ता कराची १६ लाख २४ हजार ६० रुपये एवढी थकबाकी होती. यामध्ये १ लाख ५६ हजार ६२२ एवढ्या दंड रकमेचाही समावेश होता. या थकबाकीच्या अनुषंगाने जल जोडणी खंडित करण्याची कारवाई महापालिकेद्वारे करण्यात येणार होती. या कारवाईची माहिती मिळताच संबंधित गृहनिर्माण संस्थेद्वारे मालमत्ता कर १४ लाख ६७ हजार ४३८ रुपये आणि थकबाकीवरील दंड १ लाख ५६ हजार ६२२ रुपये, यानुसार एकूण १६ लाख २४ हजार ६० रुपये एवढ्या दंड रकमेचाही भरणा महापालिकेकडे केला आहे.

(हेही वाचाः मालमत्ता कर वसुलीच्या लक्ष्यापासून १७०० कोटी रुपये दूर!)

मुलुंडच्या वर्धन हॉल वर कारवाई

टी विभागाच्या हद्दीतील ‘वर्धन हॉल’ यांच्यावर रुपये ९५ लाख ७८ हजार ४०९ एवढी मालमत्ता कराची थकबाकी आहे. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन व नोटीस पाठवून देखील मालमत्ता कराचा भरणा न करण्यात आल्याने सदर मालमत्तेची जल जोडणी खंडित करण्यात आली आहे.

घाटकोपरमध्येही कारवाई

एन विभाग हद्दीतील ‘दीप्ती सॉलिटेअर कमर्शिअल प्रॉपर्टी व श्रीपाल कॉम्प्लेक्स कमर्शिअल प्रॉपर्टी’ यांच्याकडे अनुक्रमे १७ लाख ३९ हजार ५३६ आणि ४९ लाख २२ हजार ३७५ रुपये मालमत्ता कराची थकबाकी होती. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन व नोटिस पाठवूनही मालमत्ता कराचा भरणा न करण्यात आल्याने सदर दोन्ही मालमत्तांची जल जोडणी खंडित करण्यात आली आहे.

(हेही वाचाः कर न भरलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी नवीन नियमावली)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here