मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर विचित्र अपघात! ३ जण ठार!

एका हुंदाई कारमधील चालक व अन्य एक जण असे दोन, तर कोंबडी वाहक टेम्पोचा चालक असे एकूण 3 जण या अपघातात मयत झाले असून सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे

110
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विचित्र आणि तितकाच भीषण अपघात झाला. खंडाळा घाटातील किमी 39 येथे हा अपघात झाला. त्यामध्ये ३ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर ६ जण भीषण घायाळ झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘या’ कारणाने होतात अपघात!

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कायम अपघात होत असतात. रात्रीच्या वेळी जागरण करून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांना नेमकी पहाटेच्या वेळी झोप येते आणि त्याच वेळी अधिक भीषण अपघात होत असतात. याच कारणामुळे सोमवारी पहाटे मुंबई-पुणे येथे हा भीषण अपघात झाला.

असा झाला अपघात!

मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टेम्पो चालकांचे नियंत्रण सुटल्याने तो समोरील भाजीच्या टेम्पोवर आदळला, तो टेम्पो समोरील कारवर आदळला, तसेच कोंबडी वाहक टेम्पोने एका प्रवासी बसला धडक दिली, तर एक कार टेम्पो व ट्रेलरच्यामध्ये चिरडली गेली. अशा प्रकारे हा विचित्र अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये एका हुंदाई कारमधील चालक व अन्य एक जण असे दोन, तर कोंबडी वाहक टेम्पोचा चालक असे एकूण 3 जणांचा या अपघातात  मृत्यू झाला आहे. सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर अनेक कोंबड्याही या अपघातात दगावल्या आहेत. बोरघाट पोलिस, खोपोली वाहतूक पोलिस, आयआरबी, डेल्टा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला घटनास्थळी धाव घेत मयत आणि जखमी यांना बाहेर काढले.

वेग मर्यादेसाठी नियम, तरी उल्लंघन!

मुंबई-पुणे एक्प्रेसवे वर वाढते अपघात लक्षात घेऊन हे अपघात कमी व्हावेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महामार्गात ठिकठिकाणी वेग मर्यादेचे फलक लावण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र टिपून संबंधित वाहनाच्या विरोधात एक हजार रुपयांचा आर्थिक दंड आकाराला जातो. असे असूनही या महामार्गात अपघात होत असतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.