घरगुती गॅसचे वजन करूनच घ्या…अन्यथा होऊ शकते फसवणूक

घरातील सिलेंडर मधील गॅस लवकर रिकामा होऊ नये यासाठी प्रत्येक गृहिणी गॅस जपून वापरतात, तरी देखील सिलेंडरमधला गॅस वेळेआधीच संपत असेल तर त्या मागे हे कारण असू शकते. कोणीतरी तुमच्या गॅस सिलेंडर मधून गॅसची चोरी करून त्या गॅसची परस्पर विक्री करत येत असेल. अशाच एका टोळीचा चारकोप पोलिसांनी छडा लावला आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना चारकोप पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. या टोळीजवळून मोठ्या प्रमाणात घरगुती वापरातील सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच गॅस चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

( हेही वाचा : जीएसटी चुकवणाऱ्या सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल )

मांगीलाल बिष्णोई, श्र्वाणकुमार बिष्णोई आणि तिरुमुर्ती परिहार अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.हे तिघे कांदिवली चारकोप परिसरात राहण्यास असून गॅस सिलेंडर डिलीव्हरी करण्याचे काम करतात. हे तिघे घरगुती गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्यापूर्वी त्यातील सुमारे दोन ते तीन किलो गॅस परस्पर काढून तो गॅस व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. कांदिवली पश्चिम चारकोप काका केणी चौक, या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅसची चोरी करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली होती.

चारकोप पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने या ठिकाणी पाळत ठेवून सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोचा पाठलाग करून या टोळीला मालवणी धारवली गाव या ठिकाणी असलेल्या एका गोदामातून ताब्यात घेण्यात आले. त्या गोदामाजवळ तयार करण्यात आलेल्या एका तंबूत घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस चोरी करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत गॅसचे घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत, एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य ( इलेक्ट्रिक मोटार, पाईप, इलेक्ट्रॉनिक वजन काटा) असे एकूण ९ लाख ९३हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही टोळी दिवसाला सुमारे १०० ते १५० किलो गॅसची चोरी करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये चोरलेला गॅस भरून त्याची विक्री हॉटेल व्यवसायिक, रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना चढ्या भावाने विकत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता अशी माहिती आरोपींनी दिलेली असली तरी मागील काही वर्षांपासून ही टोळी गॅस चोरी करून फसवणूक करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here