मुंब्र्यात सापडलेली ३० कोटींची रोकड हवाला रॅकेटची? एनआयए करणार तपास

172

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या ठिकाणी राहणाऱ्या खेळणी व्यापाऱ्याच्या घरात मिळालेले ३० कोटी रुपये हे हवाला रॅकेटचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या व्यापाऱ्याच्या घरात ही रोकड मिळाली तो व्यापारी म्हणजेच फैजल मेमन याचा मनीष मार्केटमध्ये खेळण्यांचा व्यवसाय असून त्याच्याकडे असलेली ही रक्कम डी-कंपनीच्या व्यक्तीने ठेवायला तर दिली नव्हती ना किंवा फैजल मलिक हा स्वतः डी -कंपनीत सहभागी तर नाही, त्याच्याकडे असलेली रक्कम देशविघातक कारवायांसाठी वापरली जाणार होती का याचा तपास आता केला जाणार आहे. एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) देखील या प्रकरणात चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंब्रा पोलिसांनी १२ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास बॉम्बे कॉलनी येथील एका घरात छापा टाकला होता. पोलीस निरीक्षक शेवाळे आणि पथकाने हा छापा टाकून फैजल मेमन याच्या घरातून खेळण्याच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलेली ३० कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेतली होती. ही रक्कम पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये भरून पोलीस ठाण्यात आणली आणि कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्यातील ६ कोटी रुपये काढून उर्वरित २४ कोटीची रोकड फैजल मेमन याला परत केली होती.

एनआयए तपास करणार 

२५ एप्रिल रोजी तिसऱ्या व्यक्तीने तक्रार अर्जाच्या माध्यमातून ही बाब पोलीस आयुक्त, गृहविभागाच्या लक्षात आणून दिली. ठाणे पोलीस आयुक्त यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त यांना देण्यात आले आहे. बेकायदेशीर रोकड मिळून आलेल्या खेळणी व्यापारी फैजल मेमन याचा मनीष मार्केटमध्ये खेळण्याचा व्यापार आहे. फैजल मेमन हा खेळणीच्या व्यापाऱ्याच्या आडून बेकायदेशीर कृत्य तर करीत नसावा ना असा संशय घेतला जात आहे. ज्या मनीष मार्केटमध्ये फैजल मेमन व्यापार करतो त्या मनीष मार्केटमध्ये डी-कंपनीचे वर्चस्व असून मेमन याचे डी- कंपनीशी संबंध असल्याची शंका उपस्थित होत करण्यात येत आहे. खेळण्याच्या व्यवसायांच्या आडून फैजल मेमन हा हवाला रॅकेट तर चालवत आहे का ? त्यांच्याकडे मिळून आलेली रोकड ही देशविघातक कृत्य करण्यासाठी तर वापरली जाणार नव्हती ना याची ही चौकशी करण्यात येणार आहे.

एनआयएने डी कंपनीच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी एनआयएने डी कंपनीशी संबंधित अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. फैजल मेमन याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे हे एनआयएकडून पडताळून बघितले जाणार आहे. एनआयए कुठल्याही क्षणी फैजल मेमन याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फैजल मेमन यांचे ९३च्या साखळी स्फोटातील आरोपी टायगर मेमन याच्याशी काही संबंध आहे का याचा देखील तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.