मुंबईच्या रस्त्यांवर ३०० कोटींचे स्ट्रीट फर्निचर: पुन्हा एकदा तीच कंपनी पात्र

123

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत विविध कामे हाती घेण्यात आल्यानंतर आता पदपथांच्या तसेच सार्वजनिक ठिकाणच्या चौकांमध्ये स्ट्रीट फर्निचर बसवण्यात येत असून याअंतर्गत बसण्याची आसने, बेंच रेलींग्ज बोलार्ड, लीटर बीन, फ्लॉवर पॉट्स आदी बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरांच्या आणि पर्यायाने रस्त्यांवरील पदपथांच्या सुधारणांमध्ये हे स्ट्रीट फर्निचर अधिक शोभा वाढवणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील ज्या ४८ रस्त्यांवर ग्लास रेंलीग्ज आणि बोलार्ड बसवण्यासाठी ज्या कंपनीला दोन वर्षांपूर्वी १२५ कोटींचे काम दिले होते, त्याच कंपनीला आता हे स्ट्रीट फर्निचर बसवण्यासाठी ३०० कोटींचे काम दिले आहे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत  १९ विभागांमध्ये मुंबईतील नामांकित नगर नियोजनकार आणि वाहतूक विभाग आदींच्या संयुक्त समितीने स्ट्रीट फर्निचर कोणत्या प्रकारची आणि कशी बसवली जावी याचा अभ्यास करून अहवाल तयार केला. यामध्ये दोन प्रकारचे सीट्स, दोन प्रकारचे ट्री ग्रेटस,तीन प्रकारचे डस्टबीन, फ्लॉवर पॉट्स,  दोन प्रकारचे बेंच रेलींग्ज बोलार्ड व लीटर बीन अशा प्रकारच्या १३ बाबींचा स्ट्रीट फर्निचरमध्ये समावेश करण्यात आला आहे. नगर नियोजनकारांनी आधुनिक पध्दतीची आणि मुंबईच्या वातावरणासाठी योग्य व टिकाऊ अशाप्रकारच्या डिझाईन्सची निवड केली आहे.

मुंबईतील कुलाबा ते भायखळा चिंचपोकळी आदी महापालिकेच्या ए वॉर्ड ते ई वॉर्ड वगळता उर्वरीत सर्व मुंबईतील विभागांसाठी हे स्ट्रीट फर्निचर बसवण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती.  यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी शांतीनाथ रोडवेज ही कंपनी पात्र ठरली आहे.

( हेही वाचा: Women’s Day 2023: महिला दिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली ‘ही’ मोठी घोषणा )

विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई शहरातील ३० रस्ते,  पूर्व उपनगरांतील ०६ रस्ते आणि पश्चिम उपनगरांतील १२ रस्ते अशाप्रकारे एकूण ४८ रस्त्यांवर ग्लास फायबर रेलिंग आणि बोलार्ड बसवण्यासाठी १२५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते आणि शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये बसवण्यात येणाऱ्या या कामांसाठी ही एकमेव शांतीनाथ रोडवेज कंपनी पात्र ठरली होती. मुंबई पोलिस आयुक्त व सह पोलिस आयुक्त यांच्याकडून महापालिका आयुक्तांना आलेल्या पत्राचा हवाला देत या कामांसाठी निविदा मागवत संबंधित कंपनीची निवड करण्यात आली होती. या कामांसाठी सप्टेंबर २०१९मध्ये मागवण्यात आलेल्या निविदा फेब्रुवारी २०२१मध्ये अंतिम करून कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. कोविडमुळे निविदा प्रक्रिया व प्रस्ताव बनवण्याचे काम लांबणीवर पडले होते. परंतु हा प्रस्तावही प्रशासनाने घाईघाईत आणून मंजूर केला होता. शांतीनाथ रोड वेज ही कंपनी यापूर्वी महापालिकेत रस्ते बनवण्याचे कंत्राट मिळवत होती. परंतु पुढे या कंपनीने रस्त्यांच्या कामांसाठी निविदा न भरता स्ट्रीट फर्निचरच्या माध्यमातून कामे मिळवण्यास सुरुवात केली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.