म्यानमारमध्ये ३०० भारतीय तरुण ओलीस; सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जाते

म्यानमारमध्ये ३०० भारतीय तरुणांना ओलीस ठेवून त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची फसवणूक करण्यास  भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून थायलंड मार्गे म्यानमार येथे पाठवण्यात आले असून या मार्गे मलेशियन आणि चायनीज टोळ्या सक्रिय असल्याचे समोर येत आहे. या भारतीय तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणेने प्रयत्न सुरू केले आहेत.
थायलंड येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाखाली मुंबई तसेच भारतातील काही महत्वाच्या शहरातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून थायलंड येथे पाठवले जात आहे. थायलंड येथे एका हॉटेलात या भारतीय तरुणाना थांबवून त्यांचे  पासपोर्ट आणि व्हिसा ताब्यात घेऊन त्यांना अवैधमार्गाने म्यानमारमधील म्यावादी या ठिकाणी  ओलीस ठेवण्यात आले आहे.

नाहीतर केला जातोय छळ

या तरुणांना क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून भारतीयांची सोशल मीडियाच्याआधारे फसवणूक करण्यासाठी बळजबरी केली जात आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल माध्यमावर असणाऱ्यांना ‘क्रिप्टो करन्सी खरेदी करून कोट्याधीश व्हा’ असे अमिष दाखवून त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सी नावाखाली मोठ्या रकमा उकळून त्यांची फसवणूक केली जात आहे. हे सर्व सायबर गुन्हे ओलीस ठेवलेल्या तरुणांकडून करून घेतले जात असून या तरुणांना क्रिप्टो करन्सी विक्री करून देण्याचे ६ महिन्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. टार्गेट पूर्ण केल्यावर त्यांना पासपोर्ट आणि व्हिसा परत दिला जाईल, अन्यथा नाही अशी धमकी देण्यात आली आहे.

भारतीय तपास यंत्रणा अलर्ट

मुंबईतील वांद्रे येथून तीन तरुणांना या प्रकारे म्यानमारमध्ये ओलीस ठेवण्यात आले असल्याचे दोन आठवड्यांपूर्वी समोर आले होते. या तरुणांनी इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून मित्र नातेवाईकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारे अनेक भारतीय तरुण आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात आले असून त्यांनीदेखील आमची येथून सुटका करा अशी कुटुंबियांकडे विनंती केली आहे. अनेक कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून हा प्रकार भयानक असल्यामुळे तपास यंत्रणांनी ही बाब केंद्रीय तपास यंत्रणेच्या लक्षात आणून दिली आहे. या तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नात असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here