प्राथमिक शिक्षण हा भविष्याचा पाया मानला जातो. या वयात पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा, यासाठी पालक प्रयत्नशील असतात. परंतु, पालकांसाठी एक निराशादायक बातमी असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची राज्यभरात ३१ हजार पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात आजमितीस प्राथमिक शाळांतील ३१ हजार, तर माध्यमिक शाळांतील २९ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. शिक्षक भरतीचे शिक्षणसंस्थांचे अधिकार काढून घेत तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आजही कायम असला, तरी गेली दोन वर्षे पवित्र पोर्टल बंद आहे. दुसरीकडे टीईटी घोटाळा उघड झाल्यानंतर शिक्षक भरती एमपीएससीमार्फत घेण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, दोन सरकारे बदलली तरी शिक्षकांच्या भरतीला मुहूर्त मिळालेला नाही.
(हेही वाचा – या ‘संकटग्रस्त’ पक्ष्यानं अवघ्या ५ दिवसांत पार केलं सायबेरिया ते मुंबईचं अंतर)
शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात प्राथमिक शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद शिक्षकांची सर्वाधिक, तर त्या खालोखाल छावणी मंडळ शाळेतील शिक्षकांची संख्या आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य आहे. या नियमाप्रमाणे पटसंख्येच्या आधारावर जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, छावणी मंडळांच्या शाळांमध्ये दोन लाख ४५ हजार ५९१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन लाख १४ हजार ११९ पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. मंजूर असलेल्या पदांपैकी तब्बल ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत.
प्राथमिक शाळांत किती रिक्त पदे?
जिल्हा परिषद – १९,४५२
महानगरपालिका – ११,०९८
नगर परिषद – ९०१
छावणी मंडळ – २१
अशैक्षणिक कामांचाही भार
शिक्षक भरतीकडे झालेले दुर्लक्ष, सेवानिवृत्तांची वाढलेली संख्या, आंतरजिल्हा बदल्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. शालेय शिक्षणात ही भीषण परिस्थिती असतानाच शिक्षकांना ई-पीक पाहणी, वाहतूक नियोजन यांसारख्या अतिरिक्त अशैक्षणिक कामांची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवावे कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्रजी, गणितासारख्या महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नसल्याने शिक्षणाची पाटी कोरी राहण्याची भीती आहे.
माहिती अधिकारांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ३१ हजार ७४२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. परंतु, खासगी आणि इतर शाळांतही तेवढीच पदे रिक्त आहेत, याकडे काणाडोळा करून चालणार नाही. त्यामुळे एकूण रिक्त पदांचा आकडा ६० हजारांच्या घरात आहे. याचा अर्थ, एका शिक्षकामागे ३० विद्यार्थी धरले, तर लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान केले. आता शाळा नियमित पद्धतीने भरत असताना शिक्षक नसल्यामुळे दुप्पट नुकसान होत आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान अशा विषयांनाही शिक्षक नसल्याने इतर शिक्षकांकडे त्याचा भार दिला जात आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे असे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community