लम्‍पी आजारातून ३ हजार २९१ जनावरे रोगमुक्त

राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार यांमुळे राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ३ हजार २९१ जनावरे औषधोपचारामुळे रोगमुक्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

( हेही वाचा : …तर भारताच्या बेचक्यात आणखी एक पाकिस्तान वसला असता – अविनाश धर्माधिकारी )

१९ सप्टेंबरपर्यंत जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली आणि रायगड अशा २७ जिल्ह्यांतील ११०८ गावांमध्ये ९ हजार ३७५ जनावरे लम्‍पीने बाधित झाली. त्यापैकी ३ हजार २९१ जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ४९.८३ लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी बाधित क्षेत्राच्या ५ कि.मी. परिघातील ११०८ गावांतील १६.४५ लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठे गोठे, जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. मंगळवारी २० सप्टेंबर रोजी आणखी २५ लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत.

२७१ जनावरांचा मृत्यू

बाधित जिल्ह्यातील जळगाव ९४, अहमदनगर ३०, धुळे ९, अकोला ४६, पुणे २२, लातूर ३, औरंगाबाद ५, सातारा १२, बुलडाणा १३, अमरावती १७, कोल्हापूर ९, सांगली २, वाशिम १, जालना १, ठाणे ३,नागपूर ३ व रायगड २ अशा २७१ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती सिंह यांनी दिली. मुंबईत अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आहेत. मंदिरांबाहेर गायी बांधल्या जातात. मिरवणुकांमध्ये बैलगाड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांना नेण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या सूचना प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आले असून, परिसरात जनावरे पाळणाऱ्यांपर्यंत संदेशही दिले जात आहेत. १३ ऑक्टोबरपर्यंत पशुपालकांनी या नियमांचे पालन करावे, असे या आदेशात नमूद आहे. तसेच लम्‍पी करीता मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले असून, मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here