पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जो अशक्तपणा आणि आजारपणाची परिस्थिती निर्माण होते त्याला कुपोषण म्हणतात. किंवा त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल. कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो आणि त्या स्थितीला कुपोषित होणं म्हटलं जातं. भारतात ३३ लाखांहून अधिक मुले कुपोषित असून त्यापैकी निम्म्याहून अधिक गंभीर कुपोषित श्रेणीत येतात. यामध्ये महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात उच्च स्थानी आहेत, असे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एका आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे. तसेच कोरोना महामारीमुळे गरिबातील गरीब लोकांमध्ये आरोग्य आणि पोषणाचे संकट आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती महिला आणि बाल विकास मंत्रालयाने व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत देशातील १७.७६ लाख मुले गंभीर कुपोषित आहेत. याशिवाय १५.४६ लाख बालके अल्प प्रमाणात तीव्र कुपोषित आहेत.
३३ लाख बालकं कुपोषित
दरम्यान, ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एकूण ३३ लाखांहून अधिक मुले कुपोषित आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. पोषण परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी गेल्या वर्षी तयार केलेल्या न्यूट्रिशन ट्रॅकर अॅपद्वारे कुपोषित बालकांच्या संख्येचा पाठपुरावा घेण्यात आला आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंगणवाडी व्यवस्थेतील ८.१९ कोटी मुलांपैकी ३३ लाख कुपोषित आहेत, जे सरासरी बालकांच्या एकूण प्रमाणात ४.०४ टक्के इतके आहे.
(हेही वाचा – धारावीत शुन्याची हॅट्रीक! सात दिवसांत ‘कोरोना’चे चारच रुग्ण)
कुपोषितांच्या संख्येत ९१ टक्क्यांनी वाढ
मागील वर्षाच्या कुपोषित बालकांच्या आकडेवारीची तुलना केल्यास एका वर्षात तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत ९१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या ९.२७ लाख होती, जी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी वाढून १७.७६ लाख झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी गंभीर कुपोषित बालकांची संख्या ३६ राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांद्वारे मोजण्यात आली आहे.