मालाड पश्चिम आणि जोगेश्वरी पूर्व येथील तीन पुलांसाठी निविदा न काढता ३५ कोटींचे कंत्राट

171

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या अधिपत्याखाली महापालिकेचे कामकाज केले जात आहे. परंतु कोविड पूर्वी अर्थात सप्टेंबर २०१९ मध्ये तीन वाहतूक आणि दोन पादचारी पुलांच्या बांधकामाचे कंत्राट दिले होते. सुमारे ३१ कोटींच्या कंत्राट कामांमधील काही पुलांची कामे पूर्ण होवू शकली नाही. परंतु पुलांची ही कामे अपूर्ण असताना महापालिकेने निविदा न काढताच आणखी तीन पुलांच्या बांधकामांचे ३५ कोटी रुपयांचे अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे जेवढ्या किमतीचे कंत्राट दिले होते, तेवढ्या रकमेपेक्षा अधिक किमतीचे कंत्राट निविदा न काढता देत प्रशासकांनी कंत्राटदारांचे भले करण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : ओ नाना पटोले, दहशतवाद हा कोणाचा व्यवसाय आहे?)

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील अस्तित्वात असलेल्या तीन पुलांची व दोन पादचारी पुल पाडून त्याठिकाणी पुनर्बांधणी करण्यासाठी सप्टेंबर २०१९मध्ये बुकॉन इंजिनिअर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करून त्यांना ३१ कोटी ८३ लाखांचे कंत्राट स्थायी समितीने मंजूर केले होते. या कामाचा कंत्राट कालावधी पावसाळा धरून २४ महिने असा होता. त्यानुसार हे काम १ ऑक्टोबर २०१९ पासून सुरु झाले होते. त्यानुसार हाती घेण्यात आलेल्या पुलांपैंकी तीन वाहतूक पूल आणि एका पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर एका वाहतूक पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

ही कामे सुरु असतानाच महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या ब्यूकॉन इंजिनिअरींग एँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मालवणीला जोडणाऱ्या लगून रोडवर मालवणी आणि महाकालली नाल्यावर मालाड रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी दोन वाहतूक पूल आणि जोगेश्वरी पूर्व येथील मजास नाल्यावर एक वाहतूक पूल बांधण्याचे काम याच कंपनीला देण्यात आले. या कंपनीला ३५ कोटी ३९ लाख ६४ हजारांचे रुपयांचे कंत्राट देण्यात आले. यापूर्वी देण्यात आलेल्या कंत्राट कामांपेक्षा ११० टक्के अधिकचे कंत्राट कोणत्याही प्रकारच्या निविदा न काढता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीला देण्यात आले. यापूर्वी पश्चिम उपनगरातील तीन पुलांची व दोन पादचारी पुलांचे बांधकाम करण्यासाठी ९ सप्टेंबर २०१९ रोजी स्थायी समितीने मंजूर केलेल्या ३१ कोटी ८३ लाख ७९ हजार रुपयांच्या कंत्राट रकमेत ३५ कोटी ३९ लाख ६४ हजारांच्या अतिरिक्त कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्या तीन पुलांच्या कामांसाठी ३५.३९ कोटी रुपयांचा वाढीव खर्च विना निविदा करण्यात येत आहे.

विना निविदा कंत्राटदारावर सोपवलेल्या पुलांची कामे

मालाड लघून रोडवर मालवणी नाल्यावरील पूल

  • पुलाची लांबी : १९.७० मीटर
  • पुलाची रुंदी : १७.७० मीटर
  • पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम : आर सीसी पाईल्स व डांबरीकरण

मालाड पश्चिम येथील लघुन रोडवर महाकाली नाल्यावरील पूल

  • पुलाची लांबी : २४.९२४मीटर
  • पुलाची रुंदी : १८.३० मीटर
  • पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम : आर सीसी पाईल्स व डांबरीकरण

जोगेश्वरी पूर्व मजास नाल्यावरील वाहतूक पूल

  • पुलाची लांबी : १६.८५ मीटर
  • पुलाची रुंदी : ०९.०० मीटर
  • पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम : आर सीसी स्लॅब व डांबरीकरण
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.