थायलंडमधील नाँगबुआ लम्फू शहरातील एका पाळणाघरात झालेल्या गोळीबारात २४ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याव्यतिरीक्त ११, अशा एकूण ३५ ते ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोर हा माजी पोलीस अधिकारी असून त्याने स्वत:च्या कुटुंबाचीही हत्या करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पानिआ कामराप (३४) असे त्या हल्लाखोराचे नाव आहे.
(हेही वाचा – MSRTC: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड? बोनस जाहीर होण्याची शक्यता)
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने पाळणाघरात प्रवेश करत गोळीबार केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. घरी पोहोचल्यानंतर त्याने पत्नी आणि मुलाचीही गोळी घालून हत्या केली. अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या हल्लेखोर पानिआची मागील वर्षी पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र पाळणाघरात पानिआ कामराप याने केलेल्या हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नाँगबुआ लम्फू या शहरातील पाळणाघरामध्ये गुरूवारी ही भीषण घटना घडली. पाळणाघराचा बंद दरवाजा तोडून या नराधमाने हे कृत्य केले. त्या पाळणाघरातील खोल्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. पाळणाघरामध्ये हल्ला करण्यासाठी पानिआ कामराप याने हँडगन, शॉटगन व चाकूचा वापर केला.