मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील ३८ कल्व्हर्ट्स स्वच्छ झाले असून आणखी ४५ कल्व्हर्ट्सच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. तर या मध्य रेल्वेच्या मार्गावरील ५९ किलोमीटर नाल्यांचे गाळ काढण्यात आला आहे, तर आणखी ५९ किलोमीटर नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील साफसफाईद्वारे १.७५ लाख घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
( हेही वाचा : पुन्हा आरटीपीसीआर चाचण्या सुरु होणार )
मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला. प्रधान विभागप्रमुख आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या उपस्थितमुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वेने केलेल्या पावसाळ्याच्या तयारीबाबतचे सादरीकरण या बैठकीत केले.
आगामी पावसाळ्यात सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडे छाटणे, खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर इ. तयारी मध्य रेल्वेने पावसाळ्यासाठी केली आहे.
यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना लाहोटी यांनी पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करावीत. सर्व असुरक्षित ठिकाणी २४ बाय ७ देखरेख ठेवण्याची आणि राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मध्य रेल्वेच्या १९ ठिकाणांवर विशेष लक्ष
मध्य रेल्वेने अतिवृष्टीदरम्यान रेल्वे रुळांवर साचणाऱ्या पाण्यासंदर्भात १९ संवेदनशील ठिकाणे निश्चित केली आहे आणि या ठिकाणी ८३ पंप बसवण्याची योजना आखली आहे. यावर्षी एकूण १४९ पंप बसवले जाणार आहेत, त्यापैकी रेल्वे ११८ पंप आणि मुंबई महानगरपालिका उर्वरित ३१ पंप बसवणार आहे. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूरप्रवण ठिकाणी पंपांची क्षमता आणि पंपांची संख्या वाढवण्यात आली आहे. मेन लाईनवर मस्जीद, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळक नगर ही ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत.
झाडांची छाटणी
रेल्वे मार्गाच्या शेजारी असलेल्या झाडांच्या फांद्या पडून किंवा झाडे पडून मुसळधार पावसात लोकल रेल्वे विस्कळीत होण्याची भीती लक्षात घेता यंदा रेल्वेने ७,८९३ वेगवेगळ्या ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी किंवा झाडे कापण्याचे हाती घेतले आहे. हे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.