वर्ष संपायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईकर थर्टीफर्स्टचं जोरदार स्वागत करण्यासाठी प्लान करताना दिसताय. फक्त मुंबईकरच नाही तर मुंबई पोलीस यंत्रणा आणि वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहेत. यंदा मुंबईत थर्टीफर्स्टचं जल्लोषात स्वागत होणार असल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. तर रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल २००० वाहतूक पोलीस मुंबईत तैनात असणार आहे.
थर्टीफर्स्टसाठी पोलीस यंत्रणाही सज्ज
मुंबईत रात्री दोन वाजेनंतर होणाऱ्या सेलिब्रेशनमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस सज्ज आहेत. तर मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून ४ पोलीस उपायुक्त, २००० वाहतूक पोलीस कर्मचारी, वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक मार्ग बंद राहणार असून अनेक ठिकाणी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. तर अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहराच्या १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
मुंबईतील हे मार्ग राहणार बंद
मरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लायओव्हरपर्यंत उत्तर वाहिनी गरज भासल्यास बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे.
Join Our WhatsApp Community