मुंबईतून चोरीला गेलेल्या चार महिन्यांच्या मुलीची तामिळनाडू राज्यातून सुटका करून पोलिसांनी ११ जणांच्या टोळीला मुंबई आणि तामिळनाडू येथून अटक केली आहे. परंतु आता मुलगी चोरीला गेल्याची तक्रार देणारी माताच बेपत्ता झाल्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. दरम्यान सुखरूप सुटका करण्यात आलेल्या मुलीचे माता-पिता नक्की कोण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मुलीची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
मुलीची तमिळनाडूत विक्री
२५ डिसेंबर २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील व्ही.पी.रोड परिसरात राहणारी अन्वरी अब्दुल रशीद शेख (५०) या महिलेने, व्ही.पी.रोड पोलिस ठाण्यात धाव घेत, तिच्या चार महिन्यांच्या मुलीला इब्राहिम शेख हा चोरी करून घेऊन गेला असल्याची तक्रार दाखल केली होती. इब्राहिम हा अन्वरी सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून मुंबई आणि कल्याण परिसरातून इब्राहिम शेख, मोहम्मद शेरखान उर्फ शेरू पीर मोहम्मद खान, लक्ष्मी मुर्गेश, सद्दाम शाह, अमजद शेख, अमजद शेख आणि ताहीर उर्फ रेश्मा शेख या सहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मुलीची तमिळनाडूत ४ लाख ८० हजार मध्ये विक्री केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
( हेही वाचा : लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई! )
डीएनए चाचणी करण्याचा निर्णय
पोलिसांचे एक पथक ताबडतोब तमिळनाडूत येथे रवाना झाले. ज्या व्यक्तीला मुलीची विक्री केली, त्याला ताब्यात घेऊन मुलीची सुखरूप सुटका केली, त्यानंतर तमिळनाडूत येथून कार्तिक राजेंद्र, चित्रा कार्तिक, तामिळ थंगराज, मूर्ती सामी आणि आनंदकुमार नागराजन या पाच जणांना ताब्यात घेऊन मुलं चोरी आणि विक्री प्रकरणी एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी इब्राहिम शेख हा स्वतःला मुलीचा पिता असल्याचे पोलिसांना सांगत असल्यामुळे पोलिस देखील संभ्रमात पडले असून त्यात मुलीची चोरी झाल्याची तक्रार देणारी मुलीची आई अन्वरी ही १ जानेवारीपासून बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुलीची आई अन्वरीच्या मागावर आहे. दरम्यान मुलीचा पिता म्हणवणाऱ्या इब्राहिम शेख आणि मुलीची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
Join Our WhatsApp Community