लग्नगाठ जुळवण्यासाठी अनेक जण विविध विवाह संकेतस्थळावर आपले नाव नोंदवून आपला जीवनसाथी शोधतात. या विवाह संकेतस्थळामुळे अनेकांना आपल्या मनाप्रमाणे साथीदार भेटले आहेत. मात्र या संकेतस्थळाचा वापर अनेक जण फसवणुकीसाठी करत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आलेले आहे. असाच एक प्रकार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत समोर आला आहे. गुन्हा शाखेने अशा एका ३४ वर्षीय उच्चशिक्षित व्यक्तीला यासंदर्भात अटक केली आहे, या व्यक्तीने सुमारे ४० तरुणी आणि महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. विशाल सुरेश चव्हाण उर्फ अनुराग चव्हाण (३४) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे राहणारा विशाल हा उच्चशिक्षित असून त्याने बी-टेक आणि एमबीए केलेले आहे.
( हेही वाचा : मॉडेलिंग क्षेत्रात मदत करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणीवर अतिप्रसंग, मुंबईतील व्यावसायिकाला अटक )
२ लाख २५ हजारांची फसवणूक
कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीने एका विवाह संकेतस्थळावर आपले नाव नोंदवले होते. लग्न जुळवणाऱ्या या संकेतस्थळावरून विशालने तिला संपर्क केला. त्याने अनुराग चव्हाण या नावाने बोगस प्रोफाइल तयार केली होती. त्याने बड्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करीत असल्याचे सांगून या तरुणीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवले. संबंधित तरूणी आपल्या जाळ्यात अडकल्याचे बघून त्याने तिला शेअर्स बाजारात पैसे गुंतवणूक करण्यासाठी तयार केले आणि बँक खात्यात २ लाख २५ हजार टाकण्यास सांगितले. या तरुणीने बँकेत पैसे टाकल्यानंतर विशाल उर्फ अनुराग याने या तरुणीला संपर्क करायचे बंद केले. पीडित तरुणीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, आपली फसवणूक झाल्याचे कळताच या तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचा संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष ७च्या पथकाने सुरू केला. कक्ष ७ च्या प्रभारी पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती, पोलीस पथकाने विविध संकेतस्थळ तसेच मोबाईल क्रमांक यांच्यावरून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने प्रत्येक ठिकाणी खोटे पत्ते देऊन बोगस खाते उघडले होते. महिनाभराच्या तपासानंतर तपास पथकाच्या हाती फसवणूक करणाऱ्या विशाल उर्फ अनुराग याची माहिती लागली. कल्याण पूर्व येथील श्रद्धा सोसायटी या इमारतीत विशाल राहत असून अटकेच्या भीतीने त्याने स्वतःला घरात बंद करून बाहेरून कुलुप लावून घेतले आहे अशी माहिती तपास पथकाला मिळाली.
पोलिसांकडून अटक
तपास पथकाने त्याची इतर माहिती गोळा केली असता विशाल हा हॉटेल मधून जेवण मागवतो, जेवणाची डिलिव्हरी देण्यासाठी येणाऱ्या बॉयला तो खिडकीतून चावी देऊन दार उघडून ऑर्डर घेत आणि पुन्हा कुलुप लावायला सांगतो अशी माहिती पोलिसांच्या मिळाली. पोलिसांनी हॉटेल शोधून काढले व स्वतः डिलीव्हरी बॉय बनून विशालच्या घरी दाखल झाले व विशाल चव्हाणला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत विशालने मुंबई तसेच इतर शहरांमध्ये सुमारे ४० ते ४५ तरुणी महिलांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे, काही तरुणीना तर त्याने लग्नाचे आमिष दाखवत शरीर संबंध देखील ठेवले अशी माहिती समोर आली. त्याच बरोबर आयफोन मोबाईल कंपनीत नोकरी असल्याचे अनेकांना सांगून कमी किंमतीत आयफोन घेऊन देतो म्हणून २५ जणांकडून त्याने रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community