राज्यात सोमवारी नवे ४३१ कोरोनाचे रुग्ण सापडले. तर २९७ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.९ टक्के आहे.
राज्यात ४३१ कोरोनाचे रुग्ण
सोमवारी कोरोनाच्या कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे. मात्र मुंबई, ठाणे आणि पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येत सोमवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या अनुक्रमे २ हजार २३८ (मुंबई), ३९३ (ठाणे) आणि पुण्यात २५२ पर्यंत पोहोचली. त्याखालोखाल रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ९४ पर्यंत पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातही येत्या दोन दिवसांत रुग्णसंख्या शंभरीपार जाईल, अशी भीती आरोग्य विभागातील अधिका-यांनी व्यक्त केली. राज्यात आता ३ हजार १३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
( हेही वाचा : पूरस्थितीवर उपाययोजना करण्याऐवजी चिपळूणकरांना ४ महिन्यांसाठी स्थलांतरित होण्याचे आदेश)
राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या चाचणीसाठी ८ कोटी ९ लाख ३ हजार ४५१ जणांचे नमुने घेतले गेले. त्यापैकी ७८ लाख ८६ हजार ३७५ रुग्णांमध्ये कोरोना विषाणू आढळला. राज्यातील कोरोना पॉझिटीव्हचे प्रमाण ९.७५ टक्के नोंदवले गेल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community