एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर! दिवाळीपूर्वी होणार ऑक्टोबरचा पगार

महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ, मंत्री अनिल परब यांची घोषणा

119

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला दिवाळीची गोड भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी सोमवारी केली. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.

महागाई भत्ता आता १७ टक्के होणार

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्री, ॲड. परब यांनी घेतला. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल ॲड. परब यांनी त्यांची आभार मानले आहेत.

(हेही वाचा- कात्री सर्वसामान्यांच्या खिशाला…एसटी भाडेवाढ ऐन दिवाळीला !)

एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ

इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही, भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.