शेतकरी का म्हणतायेत आम्हाला नक्षलवादी व्हायचे? वाचा…

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावातील ५० शेतकऱ्यांनी ‘आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी’, अशी खळबळजनक मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या शेतकऱ्यांनी तहसीलदारामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत गावात उपोषण करण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.

शेतकऱ्यांचे निवेदन

अनियमित पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामावर निसर्गाचा कोप झाला, तर आता रब्बी हंगामावर वीज पुरवठ्यामुळे परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. रब्बी हंगाम सुरू होताच महावितरण कंपनीने कोणतीही नोटीस न बजावता परस्पर वीज खंडित केली आहे. शेतकरी सध्याच्या बिलाची अर्धी रक्कम भरण्यास तयार आहेत. मात्र महावितरणचे अधिकारी त्यांचे ऐकून घेत नाहीत. तसेच विजेची जोडणी करण्यासही तयार नाहीत, असे शेतकऱ्यांनी अर्जात नमूद केलेले आहे.

( हेही वाचा : परमबीर सिंग अखेर प्रकटले! कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी )

नक्षलवादी होण्यास परवानगी द्या!

एकीकडे सरकार मदत करते, तर दुसरीकडे मात्र वीज बिल वसुली सुरू आहे. यामुळे, रब्बी पिकाचे सुद्धा नुकसान होणार म्हणून, शेतकरी पूर्णत: हताश झाले असून जगायचे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुलाबाळांसहीत आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केले आहे. या निवेदनावर गावातील पन्नासच्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here