मुंबई महानगर पालिकांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसह खासगी अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी या पुरस्कारासाठी निवड झालेल्या ५० शिक्षकांची नावे जाहीर केली. या पुरस्कारासाठी महापालिकेसह खासगी शाळांमधील १०३ शिक्षकांनी अर्ज केला होता, त्यातील ५० शिक्षकांची निवड झाली झाली असून येत्या काही दिवसांमध्ये या पुरस्कार विजेत्यांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त भिडे यांनी दिली आहे.
( हेही वाचा : वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा परवाना निलंबित करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश)
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस असून त्यांच्या स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने शिक्षकांना सन्मानित करण्यात येत आहे. सन १९७१ पासून हा पुरस्कार २ शिक्षकांना देण्यास सुरुवात केली. तर सन २०११ पासून मुंबईतील आदर्श ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असून या पुरस्कारासाठी सर्व शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये १०३ शिक्षकांकडून अर्ज प्राप्त झाले असून त्यातील ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रत्येकी १० हजार रुपये इसीएसद्वारे थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे. तर महापालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व फेटा देवून महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी मराठी माध्यमाच्या १०, हिंदी माध्यमाच्या ०६, उर्दु माध्यमाच्या ०६, इंग्रजी माध्यमाच्या ०५, गुजराती,कन्नड, विशेष मुलांची शाळा यांच्या प्रत्येकी एक, महापालिका शाळा शारीरिक शिक्षण दोन,चित्रकला एक आणि हस्तकला आणि कार्यानुभव यांचे दोन, महापालिका माध्यमिक शाळेचे ४, मान्यता प्राप्त खासगी अनुदानित ०९ आणि मान्यता प्राप्त खासगी विना अनुदानित ०१ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. जे १०३ शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते, त्यात पुरुष शिक्षक ३७ आणि महिला शिक्षकांचे ६६ अर्ज प्राप्त झाले होते.
या आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी १० वर्षे निष्कलंक सेवा झालेल्या शिक्षकांना समावेश असणे, तसेच शिक्षकांची पटनोंदणीसाठी व गळती रोखण्यासाठी केलेला प्रयत्न, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वत: केलेले लेखन, शिक्षकांची अध्यपन पध्दती, विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेचा दर्जा, तसेच खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पुरस्कार देताना त्यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा आणि सहकार्याचा विचार आदी निकषांचा अभ्यास करून अंतिम ५० शिक्षकांची आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपायुक्त केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्या यादीमध्ये कोणत्या शाळांमधील कोणते शिक्षक आहे ते वाचा
Join Our WhatsApp Community