‘भिवंडी-कल्याण शीळ फाटा’ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५६१ कोटी

175

भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाला वेग देण्यात येणार असून, यातील ५६१ कोटी ८५ लाख रुपयांच्या सुधारित कामांच्या खर्चास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प शासनाच्या निधीतून ठेव अंशदान तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

( हेही वाचा : फक्त १० रुपये खर्च करून आपल्या भावाला पाठवा राखी; पोस्टाची अनोखी संकल्पना)

पत्री रेल्वे उड्डाण पूल, कटई येथील २ रेल्वे उड्डाण पूल, विद्युत वाहिन्या व जल वाहिन्या स्थलांतरीत करणे आदी कामांमुळे कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने हा खर्च वाढला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी व आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास शासनाकडून देण्यात आलेला १०५ कोटीचा निधी वगळून उर्वरित ४५६ कोटी ८५ लाख इतका निधी शासनाच्या निधीतून महामंडळास हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

‘वर्धा बॅरेज’च्या सुधारित खर्चास मान्यता

यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या ५६५ कोटी ८७ लाख रुपये किंमतीच्या कामांना मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे बाबूळगाव तालुक्यातील ५ हजार ६६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

त्याशिवाय जव्हार तालुक्यातील मौजे हिरडपाडा येथील लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १८७ कोटी ४ लाख रुपयांच्या कामांना दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे ५ गावातील ५५० हेक्टर आदिवासी क्षेत्र सिंचित होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.