मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात मृत्यू पश्चात ५७ वर्षीय महिलेने अवयवदान केल्याने तीन जणांना जीवनदान मिळाले. या अवयवदानामुळे मुंबईतील अवयवदानाची संख्या ३१ वर पोहोचली.
५७ वर्षीय महिला झाली ब्रेन डेड
५७ वर्षीय महिलेला ३ नोव्हेंबर रोजी नानावटी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकच्या त्रासामुळे तिला तत्काळ कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिला उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबियांना दिली. मेंदू मृत झाल्यानंतरही अवयव काही तास कार्यरत असतात, हळूहळू शरीरातील इतर अवयव बंद पडू लागतात. त्यामुळे मेंदू मृत रुग्ण झाल्यानंतरही रुग्णाच्या शरीरातून अवयव दान करता येते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या कुटुंबियांना दिली.
तीन रुग्णांना मिळाले जीवनदान
अवयव दानाच्या जनजागृतीमुळे याबाबत माहिती झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. अवयवदानासाठी संमती मिळाल्यानंतर रुग्णाचे यकृत आणि दोन किडन्या दान करण्यात आल्या. दोन किडन्यांंपैकी एक किडनी नानावटी रुग्णलयातील रुग्णाला प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दिली गेली. तर दुसरी किडनी जसलोक रुग्णालयातील रुग्णाला दिली गेली. यकृत ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णासाठी पाठवले गेले. सध्या अवयव दानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे.
Join Our WhatsApp Community