आमच्या सरकारने बंजारा समाजासाठी ५९३ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. मागच्या सरकारने या समाजासाठी निधीच दिला नाही असे वक्तव्य करून संकटकाळात संजय राठोड यांच्या पाठीशी समाज आणि आम्ही उभे राहिलो मात्र काही लाेकांनी हात वर केले असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रविवार, १२ फेब्रुवारी रोजी झाले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बंजारा समाजाच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.
संकटात पाठीशी उभा रहातो तोच खरा मित्र!
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संकटात जो पाठीशी उभा रहातो तोच खरा मित्र असतो. संजय राठोड समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा करत असतात. राठोड यांच्यावर जेव्हा संकट आले तेव्हा हा समाज त्यांच्या मागे उभा राहिला, म्हणूनच आज ते पुन्हा मंत्री म्हणून उभे आहेत. तसेच मी आणि देवेंद्र फडणवीस राठोड यांच्या पाठीशी उभे राहिलो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नवी मुंबईत उभे राहणार बंजारा भवन
५० कोटी रूपये बंजारा समाजाच्या बोर्डाला देत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी उभे रहाणारे सरकार आहे. त्यांच्या शिक्षणसाठी सरकार खर्च करेल. त्यांच्या वस्तीगृहासाठी निधी देणार आहोत. तसेच नवी मुंबई येथे बंजारा भवन उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
बंजारा भाषेतून मुख्यमंत्र्यांची भाषणाला सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे हेलिपॅडवर आगमन होताच, त्यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार निलय नाईक, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज, महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी बंजारा भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पोहरादेवी सेवाध्वजाचे लोकार्पण व संत सेवालाल महाराज पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
तिजोरीची दुसरी चावी राठोडांकडे देऊ!
आनंदात सगळे येतात, पण जेव्हा संकटे असतात तेव्हा समाज मागे उभा रहातो, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, तिजोरीची चावी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, आज ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. दुसरी चावी आम्ही संजय राठोड यांच्याकडे देऊ. शेवटी तुम्ही आम्ही जीवाभावाचे आहोत.
Join Our WhatsApp Community