स्वराज्याच्या राजधानीवर ६ कोटींचा लखलखाट!

भूमिगत वीज वाहिन्यांमुळे रायगडाच्या सौदर्यांवर परिणाम नाही

128

रायगड किल्ला हा शिवछत्रपतींची राजधानी असून रायगड किल्याचा विकास व किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व नूतनीकरण करण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रुपये 6.04 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत सांगितले.

काय म्हणाले ऊर्जामंत्री?

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, या कामाचा कार्यादेश दिनांक 5 मार्च 2020 रोजी देण्यात आला. रायगड किल्याला सद्यस्थितीत 22 केव्ही कलोशे उपकेंद्रामार्फत 22 केव्ही पाचाड वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. रायगड किल्ला कलोशे उपकेंद्रापासून 15 किलो मीटर आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 2850 फूट इतकी आहे. वीज कर्मचारी व कंत्राटदाराच्या कर्मचा-यांनी कोरोनाच्या काळात अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करुन आवश्यक भूमिगत केबल (वजन अंदाजे 515 किलो) व 4 वितरण रोहित्र (वजन अंदाजे 734 किलो प्रत्येकी) हाताने ओढत व खांद्यावर भार घेऊन हे साहित्य गडावर पोचवण्यात आले, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

(हेही वाचा – कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण-गोव्यासाठी आणखी नवा रस्ता)

तसेच, रायगडावर सुरक्षित आडोशाच्या ठिकाणी 4 वितरण रोहित्रे बसविण्यात आली आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्यांमार्फत वीज वितरण करण्यात येत असल्याने याचा रायगडाच्या सौदर्यांवर कोणतीही परिणाम होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. कोकणातील व प्रामुख्याने गडावर कोसळणारा मुसळधार पाऊस व वारे यामुळे सुरक्षितता व टिकाऊपणाच्या दृष्टीने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत, असे मंत्री डॉ. राऊत पुढे म्हणाले.

या योजनेमध्ये गडावर नवीन 4 वितरण रोहित्रे, 2 कि.मी. उच्चदाब वाहिनी, 3.05 कि.मी. लघुदाब तारमार्ग वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर व 2.5 कि.मी. लघुदाब वाहिनी इत्यादी कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे मार्च 2022 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी हे अतिशय आव्हानात्मक व कठीण काम शिवकार्य म्हणून एकजुटीने व आत्मीयतेने पूर्णत्वास नेले याबद्दल या सर्वांचे अभिनंदन डॉ. राऊत यांनी केले.

डॉ. आंबेडकरांनीही दिली होती भेट

“महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आटोपल्यावर सन १९२७ च्या डिसेंबरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड किल्ल्यास ऐतिहासिक भेट दिली. रस्ता नव्हता म्हणून नाते ते पाथर्डी पर्यंत बाबासाहेब पायी चालत गेले. बॅरिस्टर झालेली ते पहिलीच व्यक्ती जिने पायी रायगड गाठला. यावेळी उपस्थित सर्व लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणा देत होते,” अशी आठवणही त्यांनी सभागृहात सांगितली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.