जम्मू काश्मिरातील प्रवास होणार सुखकर! 60 हजार कोटींच्या रस्त्यांची कामं सुरू

141

जम्मू-काश्मिरात 60 हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. शून्याच्या खाली तापमान असूनही एक हजार लोक जोझिला बोगद्याचे काम करीत असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.

काय म्हणाले गडकरी?

यावेळी गडकरी म्हणाले की, सुरुवातीला 2026 पर्यंत ही रस्त्याची काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता ते 2024 पर्यंतच पूर्ण होणार आहेत. काश्मीरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची आणि पुलांची कामे करीत आहोत. मनालीत अटल बोगदा तयार झाला, रस्त्याने जायला यापूर्वी 3 तास लागत होते, आता 8 मिनिटांत हे अंतर कापता येते. लेह लड्डाखवरून थेट कारगिल, कारगिलवरून झेरमोर, झेरमोरहून श्रीनगर आणि श्रीनगरवरून जम्मू असा हाय-वे तयार होत आहे. या हाय-वेवर पाच बोगदे राहणार आहेत. हे वर्ष पूर्ण व्हायच्या आधी श्रीनगरवरून मुंबईला तुम्ही 20 तासांत पोहोचू शकाल, असे गडकरी यांनी सांगितले.

(हेही वाचा- )

गडकरींनी सांगितला किस्सा अन्…

आसामचे मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या निवडणूक प्रचारातील एक किस्सा सांगताना गडकरी म्हणाले की, सोनेवाल यांच्या आग्रहास्तव पुलाच्या बांधकामाची घोषणा करून टाकली. प्रचारसभेत सोनेवाल यांचा आग्रह टाळता न आल्याने मला ती घोषणा करावी लागली. परंतु, दिल्लीला परतल्यावर अधिकाऱ्यांनी त्या पुलाचा खर्च 6 हजार कोटी अपेक्षित असल्याचे सांगितले. इतका प्रचंड खर्च ऐकून धक्का बसला. परंतु, विचार केल्यानंतर मलेशिया, सिंगापूर येथील पूल बांधकामाच्या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करीत, अखेर या पुलाचे काम 680 कोटी रुपयांत युपी ब्रिज कार्पोरेशनला दिल्याचे गडकरी यांनी सांगितले.

महामार्गांवर टोल नाके मर्यादित होणार

नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार नाही. सरकारची ही योजना पुढच्या 3 महिन्यांमध्ये लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सरकार येत्या 3 महिन्यांमध्ये देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार आहे. तसेच 60 किमीच्या अंतरामध्ये केवळ एकच टोल प्लाझा सुरू राहील. नितीन गडकरींनी सांगितले की, पुढच्या तीन महिन्यांमध्ये 60 किमीच्या अंतरामध्ये येणारे अन्य टोल नाके बंद केले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.