कॉर्डिलिया क्रूझ या कारणामुळे पुन्हा चर्चेत!

113

कॉर्डिलिया क्रूझ मध्यंतरी आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ही क्रूझ चर्चेचा विषय बनली आहे. कॉर्डिलिया क्रूझ मुंबई-गोवा-मुंबई या मार्गावर चालते. गोव्यात कार्निव्हल असल्यामुळे १ हजार ४७१ पर्यटक व ५९५ कर्मचाऱ्यांना घेऊन ही क्रूझ गोव्याला रवाना झाली होती. यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे एकूण सर्व २ हजार ०६५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात ६६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व नागरिकांना तात्काळ जहाजावरच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ही क्रूझ मंगळवारी ४ जानेवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील ग्रीन गेट येथे दाखल झालेली आहे.

( हेही वाचा : कुर्ल्याचे दोन तुकडे! )

बाधित रुग्णांना कोविड केंद्रात दाखल करणार

कॉर्डिलिया बोटीवरील कोरोना बाधित प्रवाशांना रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्रात दाखल करण्यात येईल किंवा त्यांच्या इच्छेनुसार सशुल्‍क हॉटेल कोविड केंद्रात दाखल होता येईल. ही क्रूझ दाखल झाल्यावर त्यांच्या वाहतुकीसाठी १७ आसनी ५ रुग्‍णवाहिका तैनात केल्या आहेत. क्रूझवरील इतर सर्वांची आरटीपीसीआर चाचणी २ प्रयोगशाळांमार्फत करण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल उद्या बुधवार, ५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत अपेक्षित आहे. जहाजावर एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळल्यामुळे गोवा प्रशासनाने या जहाजाला पीपीई किटचा पुरवठा केला आहे. तसेच डॉक्टरांची टीमही या जहाजावर पाठण्यात आली आहे.

प्रशासनाचा बंदोबस्त

सर्व रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल प्राप्त होताच बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांना रीचर्डसन आणि क्रूडास येथील जम्बो कोविड केंद्रात दाखल केले जाईल तर, ज्यांची चाचणी नकारात्मक आली असेल त्यांना ७ दिवस गृह अलगीकरणात रहावे लागणार आहे. ग्रीन गेट येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.