मुंबईत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई म्हणजेच एमटीएनएल लँडलाईनची सेवा आणि दर्जा सुमार घसरला असून त्यात केलेल्या कंत्राटीकरणामुळे ग्राहकाने पाठ फिरवली आहे. मागील 9 वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या 7.58 लाख आहे तर त्यात समाधान म्हणजे 3.25 लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमटीएनएल मुंबईने दिली आहे.
7.58 लाख मुंबईकरांनी सेवेस ठोकला रामराम
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमटीएनएल मुंबईकडे मागील 10 वर्षात लँडलाईन ग्राहकांची संख्या, सरेंडर संख्या आणि नवीन जोडणीची संख्या याची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांस एमटीएनएल मुंबईच्या उप महाव्यवस्थापक यांनी वर्ष 2013-14 पासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. मागील 9 वर्षाची आकडेवारी लक्षात घेता सद्यस्थितीत 14,75,547 ग्राहक आहेत. ही संख्या 9 वर्षांपूर्वी 19,40,336 इतकी होती. मागील 9 वर्षात एकूण 7,58,929 ग्राहकांनी सेवेस रामराम ठोकला असला तरी याच कालावधीत 3,25,320 इतके नवीन ग्राहक जोडले गेले.
(हेही वाचा – भाजपला खिंडार! 21 नगरसेवकांनी ‘भाजप’ सोडून हाती…)
वर्ष 2020-2021 या दरम्यान 1,16,233 ग्राहकांनी लँडलाईन सरेंडर केला आहे. मागील 2 वर्षांपासून नवीन ग्राहक जोडले गेले असले तरी वर्ष 2020-2021 या दरम्यान फक्त 3998 तर वर्ष 2021-2022 या दरम्यान 2535 इतकी नगण्य संख्या आहे. मागील 2 वर्षात 1,86,477 ग्राहकांने सेवा सरेंडर केली असून फक्त 6533 इतकी नवीन जोडणी करण्यात आली आहे.
…म्हणून एमटीएनएल मुंबई सपशेल अपयशी
अनिल गलगली यांच्या मते आधीच सेवेबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि काही वर्षांत कंत्राटी कामामुळे सेवेचा दर्जा राखण्यात एमटीएनएल मुंबई सपशेल अपयशी ठरले आहे. नवीन भरती आणि सेवेची गुणवत्ता राखली तरच एमटीएनएल मुंबई स्पर्धेत तग धरु शकतो, अशी प्रतिक्रिया देत अनिल गलगली यांनी पंतप्रधान, टेलिकॉम मंत्री यांसकडे एमटीएनएल मुंबईला वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community